अखेर सचिन वाझेची पोलीस दलातून हकालपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:06 IST2021-05-12T04:06:40+5:302021-05-12T04:06:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कार प्रकरणात राष्ट्रीय तपास ...

Finally, Sachin Waze was expelled from the police force | अखेर सचिन वाझेची पोलीस दलातून हकालपट्टी

अखेर सचिन वाझेची पोलीस दलातून हकालपट्टी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कार प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेला पोलीस अधिकारी सचिन वाझेची मंगळवारी अखेर पोलीस दलातून हकालपट्टी करण्यात आली. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी ही कारवाई केली.

वाझेला पुन्हा खात्यात घेण्यापासून त्याची गुन्हेगारी गुप्तवार्ता कक्षात नियुक्ती करत, त्याच्याकडे तपासासाठी दिलेल्या मोठ्या प्रकरणापर्यंत सर्वच गोष्टी संशयाच्या फेऱ्यात अडकल्या. मुकेश अंबानी धमकी प्रकरणात वाझेला एनआयएने अटक केल्यानंतर खळबळ उडाली हाेती. नगराळे यांच्या अहवालात एनआयएने वाझेवर आतापर्यंत ठेवलेल्या सर्व आरोपांचा समावेश आहे. यात वाझेने अंबानींच्या निवासस्थानाजवळ स्फोटके भरलेली कार पार्क करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. तसेच पुरावे नष्ट केले. त्याच्यावर ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा आरोप आहे. वाझे ऑबेरॉय हॉटेलमध्ये १०० दिवस बनावट ओळखपत्राच्या आधारे वास्तव्यास होता. शिवाय गैरमार्गाने पैसे गोळा करत होता. त्याच्या वाहनातून ५ लाख ७३ हजारांची राेकड सापडली. तसेच त्याच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

वाझेने पदाचा गैरवापर करत गंभीर गुन्हे केल्याचे नगराळे यांनी केलेल्या चौकशीत स्पष्ट झाले. एखाद्या अधिकाऱ्याच्या वागणुकीमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत असल्यास त्याच्याबाबत योग्य ती विभागीय चौकशी करून बडतर्फ करण्याचा अधिकार संविधानाने पोलीस आयुक्तांना दिला आहे. त्याच भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३११ (२) (बी) अंतर्गत विशेषाधिकाराचा वापर करून अखेर वाझेची पोलीस दलातून हकालपट्टी करण्यात आली.

........................

Web Title: Finally, Sachin Waze was expelled from the police force