Join us  

अखेर MPSC च्या सदस्यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी, या तिघांची झाली नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 8:53 PM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी डॉ. देवानंद बाबुराव शिंदे, डॉ. प्रताप रामचंद्र दिघावकर आणि राजीव रणजीत जाधव यांची या अधिसूचनेनुसार नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी डॉ. देवानंद बाबुराव शिंदे, डॉ. प्रताप रामचंद्र दिघावकर आणि राजीव रणजीत जाधव यांची या अधिसूचनेनुसार नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या तीन रिक्त पदांवरील नियुक्तीस राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मान्यता दिल्यानुसार तीन सदस्यांच्या नेमणुकीच्या अधिसूचना आज जारी करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या रिक्त पदांवरील नियुक्तीला मान्यता देण्याबाबत बुधवारी सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती.  

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी डॉ. देवानंद बाबुराव शिंदे, डॉ. प्रताप रामचंद्र दिघावकर आणि राजीव रणजीत जाधव यांची या अधिसूचनेनुसार नियुक्ती करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना भरणे म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी पोलीस उपनिरीक्षक परीक्षा (496 पदे), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा (1 हजार 145 पदे), महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा परीक्षा (435 पदे), महाराष्ट्र वनसेवा परीक्षा (100 पदे), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा (16 पदे) याप्रमाणे एकूण 2 हजार 192 पदांसाठी एकूण 6 हजार 998 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र झालेले आहेत. त्यापैकी 377 उमेदवारांच्या मुलाखती झाल्या असून उर्वरित 6 हजार 621 उमेदवारांच्या मुलाखती होणे बाकी आहे. आता या सदस्य नियुक्तीमुळे या भरतीप्रक्रियेला वेग येणार असून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.

सामान्य प्रशासन राज्यमंत्री भरणे म्हणाले, केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या वाढवण्याच्या अनुषंगानेही राज्यपाल कोश्यारी यांच्यासमवेत बैठकीत चर्चा झाली आहे. आयोगाच्या एक सदस्यांचा कार्यकाल लवकरच पूर्ण होत असून त्यांची रिक्त होणारी जागा भरण्यासाठीही लवकरच प्रस्ताव पाठवण्यात येईल, असे राज्यपालांना सांगितले. हे दोन्ही प्रस्ताव प्राप्त झाल्यावर त्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही राज्यपाल म्हणाल्याचे भरणे यांनी सांगितले. 

टॅग्स :एमपीएससी परीक्षाभगत सिंह कोश्यारीअजित पवार