मुंबईकरांना खुशखबर, ऑगस्टमध्ये ‘म्हाडा’च्या लॉटरीचा मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 08:55 IST2018-06-05T01:29:43+5:302018-06-05T08:55:29+5:30
मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची प्रतीक्षा आता संपली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबई मंडळाच्या १,००० घरांसाठी म्हाडा जाहिरात प्रसिद्ध करणार आहे.

मुंबईकरांना खुशखबर, ऑगस्टमध्ये ‘म्हाडा’च्या लॉटरीचा मुहूर्त
- अजय परचुरे
मुंबई : मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची प्रतीक्षा आता संपली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबई मंडळाच्या १,००० घरांसाठी म्हाडा जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. म्हाडाकडून लवकरच याची घोषणा करण्यात येणार आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर, साधारण दीड महिन्यानंतर म्हणजे आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सोडत काढण्यात येईल.
या वर्षीच्या सोडतीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी ८००, मध्यम उत्पन्न गटासाठी २०० घरे ठेवण्यात आली आहेत. लॉटरीसाठी घरे शोधण्यात आलेले अपयश, घरांची टंचाई, नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या घरांच्या किमतींची निश्चिती हे निर्णय वेळेत होऊ न शकल्यामुळे, म्हाडाच्या २०१८च्या लॉटरीला विलंब होत होता. याला म्हाडाचा संथ कारभार कारणीभूत आहे, अशीही टीका करण्यात आली होती.
सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळ कार्यालयात नवीन घरांच्या किमती किती असाव्यात, यावर अंतिम निर्णय घेण्याची प्रकिया सुरू आहे. मुंबईतील १,००० नवीन घरांचा शोध संपला असून, घरांची निश्चिती मुंबई मंडळाकडून पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया जूनच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण करून, जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबई शहर आणि उपनगरातील एकूण १,००० स्वस्त घरांची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.
येथे घरे उपलब्ध
बोरीवलीतील महावीरनगर, गोरेगाव, विक्रोळीमधील कन्नमवारनगर, घाटकोपरमधील पंतनगर, अॅण्टॉप हिल, मुलुंडमधील गव्हाणपाडा, मानखुर्द या ठिकाणी या वर्षी म्हाडाची घरे लॉटरीसाठी उपलब्ध असतील.
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून या वर्षी आम्ही १,००० घरांची लॉटरी काढत आहोत. याचे संपूर्ण काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही घरांच्या किमतींविषयी अंतिम निर्णय सुरू आहे. तो पुढच्या आठवड्याभरात होईल. घरांच्या लॉटरीची जाहिरात जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध करू.
-दीपेंद्र सिंह कुशवाह, मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ, म्हाडा