अखेर पनवेलमध्ये कमळ फुलले

By Admin | Updated: October 20, 2014 04:25 IST2014-10-20T04:25:02+5:302014-10-20T04:25:02+5:30

पनवेल विधानसभा मतदारसंघात प्रशांत ठाकूर यांनी विजय संपादित करून या ठिकाणी आपले वर्चस्व सिध्द केले.

Finally, the lotus blossomed in Panvel | अखेर पनवेलमध्ये कमळ फुलले

अखेर पनवेलमध्ये कमळ फुलले

प्रशांत शेडगे, पनवेल
पनवेल विधानसभा मतदारसंघात प्रशांत ठाकूर यांनी विजय संपादित करून या ठिकाणी आपले वर्चस्व सिध्द केले. शेतकरी कामगार पक्षाला आपला गड पुन्हा खेचून आणण्यास यश मिळाले नाही, त्याचबरोबर बाळाराम पाटील यांचे आमदारकीचे स्वप्न भंगले. या निकालामुळे पनवेलमध्ये कमळ फुलले असले तरी ठाकूर यांच्या रुपाने भाजपाने रायगडात खाते उघडून आपले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईपासून जवळ असलेले पनवेल रायगड जिल्ह्यात असले तरी या तालुक्याचा वावर नवी मुंबईशी आहे. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पामुळे हा परिसर उजेडात आला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असून ते आणखी झपाट्याने वाढत आहे. शहरी बहुल व बहुभाषिकांचा मतदारसंघ असून या ठिकाणी सव्वा चार लाख मतदार आहेत, त्यापैकी ६८.७५ टक्के मतदान झाले आहे. गेल्या दहा वर्षात या भागात रामशेठ व त्यांचे पुत्र प्रशांत ठाकूर यांनी चांगला प्रभाव निर्माण केला आहे. पनवेल नगरपालिका हद्द व सिडको वसाहतीत ठाकूर यांचे वर्चस्व असल्याचे आजच्या निकालाने स्पष्ट झाले.
शेकापची ग्रामीण भागात चांगली ताकद असून त्या तुलनेत शहरात अधिक मते आहेत. शहरी मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी लालबावटा तन, मन, धनाने मैदानात उतरले आहे. त्यांनी अतिशय नियोजनबध्द प्रचार सिडको वसाहतीत केला. सर्वात महत्वाची बाब म्हणजे दोन महिने अगोदरच बाळाराम पाटील यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केली होती. त्या तुलनेत प्रशांत ठाकूर यांनी फक्त पंधराच दिवस मिळाल्याचे कारण म्हणजे टोलच्या प्रश्नावरच त्यांचा बराच काळ खर्ची पडला. आचारसंहिता जाहीर होण्याच्या एक दिवस अगोदर ठाकूर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि तीन दिवसात नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत कमळ हातात घेतले आणि विजय मिळवला.

Web Title: Finally, the lotus blossomed in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.