Join us  

...अखेर ‘इस्माईल युसुफ’च्या विद्यार्थ्यांना मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 4:27 AM

प्रॅक्टिकल परीक्षा परत घेणार; ५० टक्के विद्यार्थी झाले होते नापास

मुंबई : जोगेश्वरी येथील इस्माईल युसुफ महाविद्यालयातील ५० टक्के विद्यार्थी नापास झाल्याची घटना नुकतीच समोर आली होती. या प्रकरणातील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक फेरपरीक्षा घेण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. त्यानुसार त्यांची फेरपरीक्षा होऊन त्यातील ६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.इस्माईल युसुफ महाविद्यालयातून १२वी विज्ञान शाखेची परीक्षा देणारे ५० टक्के विद्यार्थी नापास झाले होते. प्रॅक्टिकल परीक्षेतील गुणांच्या गोंधळामुळे नापास झाल्याची तक्रार करीत विद्यार्थ्यांनी कॉलेज परिसरात आंदोनल केले होते. मात्र कॉलेज प्रशासनाने याविरोधात दाद न दिल्याने त्यांनी मंत्रालयात धडक देत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लक्ष घालण्याची मागणी केली होती. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत शिक्षणमंत्री तावडे यांनी चौकशीचे आदेश देत विद्यार्थीहिताचानिर्णय घेण्याच्या सूचना शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार नापास विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल परीक्षा परत घेण्याचा निर्णय होऊन त्यात आता ६२ विद्यार्थी पास झाले आहेत.या विषयातील गांभीर्य लक्षात घेत शिक्षणमंत्री तावडे यांनी चौकशीचे आदेश देत, विद्यार्थी हित लक्षात घेऊन प्रॅक्टिकल परीक्षा परत घेण्याचे आदेश शिक्षण मंडळाला दिले होते. त्यानुसार या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल परीक्षा मागील आठवड्यात घेण्यात आली, त्याचा निकाल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आला. यामध्ये मिळालेल्या गुणांमुळे बारावी विज्ञान शाखेचे ६२ विद्यार्थी पास झाले आहेत. विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाची गंभीर दखल घेत, प्रॅक्टिकल परीक्षा परत घेण्याचे आदेश देऊन न्याय मिळवून दिल्याबद्दल इस्माईल युसुफ महाविद्यालयातील विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.या विद्यार्थ्यांना लवकरच नवीन गुणपत्रिका देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुभाष बोरसे यांनी दिली आहे. तसेच यापुढेही विद्यार्थी प्रॅक्टिकलमध्ये नापास झाल्यास कॉलेजेसनी त्यांची नोंदणी करून घ्यावी जेणेकरून त्यांना जुलै फेर परीक्षेदरम्यान पुन्हा परीक्षा देता येईल, असे त्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :मुंबईविद्यार्थीशिक्षण