Join us

अखेर ‘मातृत्वा’साठी अतिरिक्त रजेच्या आदेशाचे परिपत्रक, महिला कर्मचाऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 02:20 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महिला कर्मचा-यांना दिलासा देणारे परिपत्रक अखेर प्रसिद्ध केले. एसटीच्या महिला कर्मचा-यांना नऊ महिने प्रसूती रजा देण्यात येईल, अशी घोषणा आॅगस्ट २०१७ मध्ये करण्यात आली होती.

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महिला कर्मचा-यांना दिलासा देणारे परिपत्रक अखेर प्रसिद्ध केले. एसटीच्या महिला कर्मचा-यांना नऊ महिने प्रसूती रजा देण्यात येईल, अशी घोषणा आॅगस्ट २०१७ मध्ये करण्यात आली होती. प्रत्यक्षात त्यांना सहा महिन्यांचीच प्रसूती रजा मिळत होती. या प्रकरणी ‘तीन महिने रजा केवळ कागदावर’ या आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. महामंडळाने या वृत्ताची दखल घेत, अतिरिक्त तीन महिन्यांच्या रजेबाबतच्या घोषणेचे लेखी आदेशाचे परिपत्रक शुक्रवारी काढले. त्यामुळे एसटीतील महिला कर्मचाºयांना दिलासा मिळाला आहे.सरकारी नियमानुसार एसटीतील महिला कर्मचाºयांना सहा महिन्यांची प्रसूती रजा दिली जाते. मात्र, एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत, २१ आॅगस्ट २०१७ रोजी महामंडळातील महिला कर्मचाºयांना नऊ महिने प्रसूती रजा देण्याची घोषणा केली होती. मात्र, या घोषणेचे लेखी आदेश नसल्यामुळे रजेवरून एसटीतील अधिकारी-महिला कर्मचाºयांत वादाचे प्रसंग उद्भवले. गरोदर एसटी महिला कर्मचाºयांना योग्य वेळी रजा न मिळाल्यामुळे, गर्भपात झाल्याचे प्रकारही राज्यात घडले आहेत. या प्रकरणी ‘तीन महिने पगारी रजा केवळ कागदावरच,’ अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ ने १२ मार्च २०१८ रोजी प्रसिद्ध केले. परिणामी, महामंडळाने त्वरित हालचाल करत, शुक्रवारी अतिरिक्त तीन महिने रजा देण्याचे लेखी आदेश परिपत्रकातून दिले.

टॅग्स :राज्य परीवहन महामंडळ