Join us  

फायनली... अमृता फडणवीस यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 8:05 PM

आपले वय 45 वर्षे पूर्ण नसल्याने लस घेऊ शकत नसल्याचं दु:ख होत आहे, असेही त्यांनी ट्विटरवरुन शेअर केले होते.

ठळक मुद्देअमृता यांनी कोणती लस घेतली, हे त्यांनी सांगितले नाही. केवळ, फायनली... कोरोनावरील लस घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी कोरोनावरील लसीचा पहिला डोस घेतला आहे. अमृता यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन लसीचा पहिला डोस घेतल्याचा फोटो शेअर केला आहे. सर, एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर येथे त्यांनी हा डोस घेतला आहे. यापूर्वी आपले वय 45 वर्षे पूर्ण नसल्याने लस घेऊ शकत नसल्याचं दु:ख होत आहे, असेही त्यांनी ट्विटरवरुन शेअर केले होते. 

अमृता फडणवीस आपल्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावामुळे व ट्विटरवर मत मांडण्यामुळे चर्चेत असतात. अनेकदा राजकीय मत मांडताना त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवरही टीका केली आहे. तर, पुतण्या तन्मय याने लस घेतल्यानंतरही त्यांनी परखडपणे आपलं मत माडलं होतं. आता, नियमानुसार त्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. मात्र, अमृता यांनी कोणती लस घेतली, हे त्यांनी सांगितले नाही. केवळ, फायनली... कोरोनावरील लस घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  कोणत्याही सेवेची प्राथमिकता शिष्टाचार किंवा प्रचलित धोरणाच्या आधारे असावी. नियम आणि कायद्याच्या वर कोणीही नाही. कायदा आपले काम करू शकतो. आम्ही नेहमीच न्यायासाठी उभे आहोत. आम्ही या विषयावर आपल्यासोबत आहोत. कृपया भविष्यात रांगा तोडण्याचे प्रकार थांबवण्यासाठी योग्य कृती करा, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले होते. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेल्या टीकेला अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी ‘याला म्हणतात विशेषाधिकार’ असे म्हणत तन्मन फडणवीस यांच्या लसीकरणावरुन निशाणा साधला होता. 

तन्मय यांनी हेल्थ वर्कर म्हणून लस घेतली

देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस यानं हेल्थ वर्कर असल्याचे दाखवून ‘कोरोना’ची लस घेतल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. त्याचं वय ४५ च्या वर नसतानादेखील त्याला लस कशी काय मिळाली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यासह अमृता फडणवीस यांनीही स्पष्टीकरण दिलं होतं. दरम्यान, याप्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह अन्य पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.  

टॅग्स :अमृता फडणवीसकोरोनाची लसकोरोना वायरस बातम्या