इस्थर अनुह्या हत्येचा खटला अंतिम टप्प्यात
By Admin | Updated: October 5, 2015 02:53 IST2015-10-05T02:53:47+5:302015-10-05T02:53:47+5:30
हैदराबादची अभियंता इस्थर अनुह्याच्या हत्या प्रकरणाचा खटला अंतिम टप्प्यात आला आहे. शनिवारी सरकारी वकिलांनी अंतिम युक्तिवाद संपवला.

इस्थर अनुह्या हत्येचा खटला अंतिम टप्प्यात
मुंबई : हैदराबादची अभियंता इस्थर अनुह्याच्या हत्या प्रकरणाचा खटला अंतिम टप्प्यात आला आहे. शनिवारी सरकारी वकिलांनी अंतिम युक्तिवाद संपवला. बचाव पक्षाचे वकील ८ आॅक्टोबर रोजी युक्तिवादास सुरुवात करतील. त्यामुळे या खटल्याचा लवकरच निकाल लागण्याची शक्यता आहे.
गोरेगाव येथील टीसीएस कंपनीत काम करणारी २३ वर्षीय इंजिनीअर इस्थर घरच्यांबरोबर ख्रिसमस साजरा करण्यासाठी आंध्र प्रदेशमध्ये गेली होती. ५ जानेवारी रोजी पहाटे ४:५५ वाजता ती एलटीटी स्टेशनवर उतरली, मात्र ती गोरेगावला पोचलीच नाही. तिचा अर्धा जळलेला मृतदेह कांजूरमार्ग येथील खारफुटीजवळ आढळला. १६ जानेवारी रोजी पोलिसांनी याप्रकरणी चंद्रभान सानप याला अटक केली.
विशेष महिला न्यायालयापुढे या खटल्याची सुनावणी सुरू आहे. विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी शनिवारी अंतिम युक्तिवाद केला. पीडितेला शेवटच्या क्षणी सानपबरोबर जाताना पाहिल्याचे दोन साक्षीदारांनी न्यायालयाला सांगितले. त्यामुळे पीडितेचा मृत्यू कसा झाला, हे सांगण्याचे काम बचाव पक्षाचे आहे, असा युक्तिवाद अॅड. ठाकरे यांनी केला.
त्या दिवशी सानप एलटीटी स्टेशनवर होता, हे सिद्ध करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजशिवाय आणखी दोन साक्षीदार आहेत. त्यामुळे परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी पूर्ण झाली आहे आणि या पुराव्यांवरून नि:संशयपणे पीडितेची हत्या सानपने केली असल्याचे सिद्ध होते, असाही युक्तिवाद अॅड. ठाकरे यांनी केला.
‘त्यादिवशी सानप याने त्याचा मित्र नंदकिशोर साहू याची बाईक घेतली होती. त्याने ती बाईक परत केलीच नाही. गुन्हा करताना तो मद्यधुंद अवस्थेत होता. पीडितेची बॅग सानपकडेच होती. यावरून तो या गुन्ह्यात सहभागी असल्याचे सिद्ध होते. वैद्यकीय चाचण्यांवरूही या गुन्ह्यात सानपचा हात असल्याचे उघडकीस आले आहे,’ असेही अॅड. ठाकरे यांनी न्यायालयाला सांगितले. एका दिवसात सरकारी वकिलांनी अंतिम युक्तिवाद संपवला. (प्रतिनिधी)