Join us

मध्य रेल्वे मार्गावरील चित्रपटांच्या चित्रीकरणाची गाडी वेगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 06:02 IST

मध्य रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकांवर चित्रीकरण सुरू आहे.

- कुलदीप घायवटमुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकांवर चित्रीकरण सुरू आहे. तिन्ही ऋतूंमध्ये मध्य रेल्वे मार्गावरील वेगवेगळ्या स्थानकांवर लघुपट, मालिका, चित्रपट, वेगवेगळ्या खासगी कंपन्यांच्या जाहिरातींचे चित्रीकरण होत आहे. यातून जानेवारी ते जून २०१९ या कालावधीत मध्य रेल्वेच्या तिजोरीत ४४ लाखांचा महसूल जमा झाला आहे.मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकावर चित्रीकरणासाठी सर्वाधिक रक्कम आकारली जाते. सीएसएमटीचा दर्जा अव्वल असल्याने येथे एका दिवसाच्या चित्रीकरणासाठी साधारण १.५ लाख ते २ लाख रुपये आकारले जातात.मध्य रेल्वे मार्गावरील आपटा स्थानकावर तीन वेगवेगळ्या कंपन्यांनी एक दिवसीय चित्रीकरण केले. यातून १४ लाख ६६ हजार ६६६ रुपयांचा महसूल जमा झाला आहे. तुर्भे स्थानकावरील एक दिवसीय चित्रीकरणासाठी ८३ हजार ७९३ हजारांचा तर, पनवेल स्थानकावर आठ दिवसीय चित्रीकरणासाठी २२ लाख १० हजार ६७९ रुपयांचा महसूल जमा झाला आहे. सीएसएमटी स्थानकावर दोन वेगवेगळ्या कंपन्यांनी एक दिवस चित्रीकरण केले. यातून मध्य रेल्वे प्रशासनाच्या तिजोरीत ३ लाख ६७ हजार ००६ रुपयांचा महसूल जमा झाला. तर, सीएसएमटी स्थानकावर एका कंपनीने सात दिवस चित्रीकरण केले. यातून रेल्वेला एकूण ३ लाख २० हजार ९८६ रुपयांचा महसूल मिळाला. अशा प्रकारे जानेवारी ते जून या कालावधीमध्ये एकूण ४४ लाख ४९ हजार १३५ रुपयांचा महसूल जमा झाला आहे.प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्यस्थानकावर चित्रीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या विभागांच्या संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात येते. विशिष्ट दिवस, ठिकाण, वेळ, वार आणि स्थानकाचा दर्जा यावरून रक्कम आकारली जाते. चित्रीकरणामुळे प्रवाशांची कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची दक्षता घेतली जाते, त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येते, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. चित्रीकरणाच्या दिवशी स्थानक परिसरात गर्दीचे नियोजन करण्यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढविली जाते.

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्य रेल्वे