भराव काढा, खाड्या, नदीमुखे मोकळी करा!

By Admin | Updated: July 5, 2014 04:03 IST2014-07-05T04:03:01+5:302014-07-05T04:03:01+5:30

भविष्यात मुंबईत पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये, भरतीदरम्यान समुद्राच्या लाटांचे पाणी शहरात शिरू नये आणि मुंबई शहराचा पर्यावरणविषयक प्रश्न आणखी चिघळू नये म्हणून येथील भराव काढा

Fill the fill, free the creeks, river banks! | भराव काढा, खाड्या, नदीमुखे मोकळी करा!

भराव काढा, खाड्या, नदीमुखे मोकळी करा!

मुंबई : भविष्यात मुंबईत पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये, भरतीदरम्यान समुद्राच्या लाटांचे पाणी शहरात शिरू नये आणि मुंबई शहराचा पर्यावरणविषयक प्रश्न आणखी चिघळू नये म्हणून येथील भराव काढा, खाड्या आणि नदीमुखे मोकळी करा, असे आवाहन भारतीय पर्यावरण चळवळीने सरकारी यंत्रणेला केले आहे.
समुद्राला आलेल्या मागील भरतीदरम्यान लाटांचे पाणी कधी नव्हे ते गेट वे आॅफ इंडिया, मरिन ड्राइव्ह आणि दादर चौपाटीलगतच्या रस्त्यांवर आले आणि त्याचे खापर महापालिकेवर फुटले. मात्र महापालिकेनेदेखील शिताफीने मेरिटाइम बोर्डाच्या हट्टाने व ‘सीआरझेड’चे नियम डावलून समुद्रकिनाऱ्यावर टाकलेल्या भरावामुळे मुंबईतील अनेक भागांत समुद्राच्या भरतीचे पाणी शिरल्याचे म्हणत हात वर केले. प्रत्यक्षात मात्र मूळ समस्येकडे कोणीच लक्ष दिले नाही. दरम्यानच्या काळात पर्यावरण तज्ज्ञ अ‍ॅड. गिरीश राऊत यांनी याबाबत आवाज उठविला. त्यांनी सांगितले की, केवळ मुंबईच नाही तर सर्व किनारपट्ट्या बुडत आहेत. वाढते तापमान आणि बाष्पीभवनामुळे ढगफुटी, गारपीट, अतिवृष्टी, वादळे, महापूर, ध्रुवावरील बर्फ वितळणे आदी घटना घडत आहेत. याला आपण जबाबदार आहोत. महत्त्वाचे म्हणजे ५० अंश सेल्सिअसवर मानवी शरीर टिकू शकत नाही. ५५ अंश सेल्सिअसला पाण्याची वेगाने वाफ होते. शिवाय येत्या नऊ वर्षांत तापमानवाढ अनियंत्रित होणार आहे. त्यामुळे यासंदर्भात सर्वांनीच पुढे येत पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. मुंबईकरांना यासंदर्भातील अधिकाधिक माहिती मिळावी या उद्देशानेच भारतीय पर्यावरण चळवळीच्या वतीने येत्या ९ जुलै रोजी सायंकाळी ५.३० ते ८.३० वाजेदरम्यान दादर येथील दादर सार्वजनिक वाचनालयाच्या धुरू सभागृहात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या जाहीर सभेत राजस्थानमध्ये नद्यांना पुनरुज्जीवित करणारे जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह हे मार्गदर्शन करणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Fill the fill, free the creeks, river banks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.