अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार
By Admin | Updated: December 17, 2014 02:03 IST2014-12-17T02:03:44+5:302014-12-17T02:03:44+5:30
अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. राजकीय नेत्यांसह

अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार
नवी मुंबई : अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. राजकीय नेत्यांसह सर्वांनी परवानगी घेऊनच होर्डिंग लावण्यात यावे, अन्यथा कारवाई होईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
उच्च न्यायालयाने अनधिकृत होर्डिंगविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश सर्व महापालिकांना दिले आहेत. परंतु यानंतरही महापालिका कार्यक्षेत्रामध्ये राजकीय पदाधिकारी, व्यावसायिक व इतर संस्था अनधिकृत होर्डिंग लावत आहेत. यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन होवू लागले आहे. महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे होर्डिंग लावणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. याविषयी प्रसारमाध्यमातूनही महापालिकेवर टीका होवू लागली आहे. यामुळे प्रशासनाने आता कडक भूमिका घेतली आहे. शहरातील राजकीय पक्ष, जाहिरात एजन्सी, व्यापारी,उद्योजक, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक संस्थांना रीतसर शुल्क भरूनच होर्डिंग लावावे असे आवाहन केले आहे.
शहरात जर अनधिकृत होर्डिंग आढळून आल्यास संबंधितांवर थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. कोणालाही अभय देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिकेने १८००२२२३०९ व १८००२२२३१० या दोन हेल्पलाइन प्रसिद्ध केल्या आहेत. या हेल्पलाइनवर नागरिकांनी अनधिकृत होर्डिंगची माहिती द्यावी. संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल अशी माहिती महापालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)