Join us  

'वारीस पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 6:28 AM

सामाजिक कार्यकर्त्याची अंधेरी पोलिसांत तक्रार

मुंबई : वादग्रस्त विधान करणारे आॅल इंडिया मजिलीस ए इत्तेहुल मुस्लिमीन (एमआयएम) मुंबईचे प्रवक्ते, तसेच भायखळ्याचे माजी आमदार वारीस पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज म्हस्के यांनी केली आहे. अंधेरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी या प्रकरणी त्यांनी लेखी तक्रार केली असून, देशातील शांततेसाठी पठाण यांचे वागणे धोकादायक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

म्हस्के यांनी त्यांच्या ‘संघर्ष’ नामक संस्थेच्या लेटरहेडवर लेखी तक्रार शुक्रवारी सकाळी अंधेरी पोलीस ठाण्यात दिली. कर्नाटकाच्या गुलबर्गा येथील कार्यक्रमात ‘१५ कोटी मुस्लीम १०० कोटी हिंदुंनाही पुरून उरतील,’ असे वादग्रस्त विधान पठाण यांनी केल्याचे मी वृत्तवाहिन्यांवर पाहिले. यामुळे समाजात तेढ, भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. अशी भीती पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. पठाण यांच्याविरोधात संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. आम्हाला म्हस्के यांची तक्रार मिळाली आहे. याबाबत चौकशी सुरू आहे. मात्र, अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, अशी माहिती परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी दिली.

भाजपची निदर्शनेवारिस पठाण यांच्या विरोधात शुक्रवारी मुंबई भाजपच्या कार्यकर्त्यांनी भायखळा स्थानकाबाहेर आंदोलन करत निदर्शने केली. पठाण यांच्या चिथावणीखोर भाषणाचा निषेध करत, त्यांच्या अटकेची मागणी केली. दक्षिण मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष शरद चिंतनकर, कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर यांच्यासह स्थानिक भाजप नेते, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. निदर्शनानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने भायखळा पोलिसांत तक्रार दाखल करत, पठाण यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली.

टॅग्स :ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनमुंबईवारिस पठाण