‘त्या’ बाळंतीणीच्या मृत्यूची चौकशी, गुन्हा दाखल

By Admin | Updated: March 25, 2015 23:14 IST2015-03-25T23:14:57+5:302015-03-25T23:14:57+5:30

जिल्हा रुग्णालयात स्ट्रेचर आणि औषधोपचार वेळेत न मिळाल्यामुळे उषा धर्मेंद्र पवार (२४) या बाळंतिणीचा रुग्णवाहिकेतच झालेल्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश सहायक आरोग्य संचालक के.आर. खरात यांनी दिले.

'That' the file for the death of the baby girl, the complaint filed | ‘त्या’ बाळंतीणीच्या मृत्यूची चौकशी, गुन्हा दाखल

‘त्या’ बाळंतीणीच्या मृत्यूची चौकशी, गुन्हा दाखल

ठाणे : जिल्हा रुग्णालयात स्ट्रेचर आणि औषधोपचार वेळेत न मिळाल्यामुळे उषा धर्मेंद्र पवार (२४) या बाळंतिणीचा रुग्णवाहिकेतच झालेल्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश सहायक आरोग्य संचालक के.आर. खरात यांनी दिले. त्यांनी रुग्णालयात महिलेच्या कुटुंबीयांची आणि आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. चौकशीत तथ्य आढळल्यास दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले. तसेच जे.जे. रुग्णालयात पुन्हा शवविच्छेदन करण्याचेही मान्य केले. कालच्या घटनेचे शहरात तीव्र पडसाद उमटले. मनसेने या प्रकरणाच्या चौकशीसाठी बुधवारी सकाळपासून ठिय्या आंदोलन केले. अखेर, याची चौकशी करून दोषींवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, ‘त्या’ महिलेच्या मृत्यू प्रकरणी जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या विरोधातही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाणे नगर पोलिसांनी दिली.
‘सिव्हीलच्या दारातच बाळंतिणीचा मृत्यू’ या मथळ्याखाली ‘लोकमत’च्या बुधवारच्या अंकात वृत्त प्रसिद्ध झाले होते. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी आणि संबंधितांवर कारवाईसाठी मनसेचे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली सिव्हीलच्या प्रवेशद्वारातच सकाळी ११ वा.पासून ठिय्या आंदोलन करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गौरी राठोड यांनी स्वत: याबाबतचा खुलासा करून पवार कुटुंबीयांना दिलासा द्यावा, अशी माफक अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी केली होती. मात्र, डॉ. राठोड यांनी खुशाल गुन्हे दाखल करा, असे म्हणत आंदोलक आणि त्या महिलेच्या नातेवाइकांकडे येण्याचे टाळले. तत्पूर्वी, बुधवारी पहाटे २ वा.च्या सुमारास त्या महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदनही करण्यात आले. ज्या रुग्णालयावर संशय आहे, तिथेच शवविच्छेदन केल्यामुळे ते मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात करण्याचीही मागणीही केली. रुग्णालय प्रशासनावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल केला.

अशी होणार चौकशी
अनगाव आरोग्य केंद्रातून उषाला भिवंडीच्या इंदिरा गांधी रुग्णालयात का पाठविले, याची चौकशी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब सोनवणे करणार आहेत. भिवंडीच्या रुग्णालयात काय उपचार झाले? तिला नेमके कशामुळे जिल्हा रुग्णालयात पाठविले, याची चौकशी उल्हासनगरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर करणार आहेत. ठाण्यातील घडामोडींची चौकशी प्रभारी सहायक संचालक डॉ. बाबूळगावकर आणि सहायक संचालक खरात यांच्याकडे सोपविली आहे. याबाबतचा अहवाल ते आरोग्य संचालकांकडे सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: 'That' the file for the death of the baby girl, the complaint filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.