Join us  

पन्नास, शंभर, दोनशेच्या नव्या नोटांचा रंग उडाला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2021 1:26 AM

ग्राहकांच्या बँकांमध्ये वाढल्या तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नोटाबंदीनंतर जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द होऊन नव्या पाचशे आणि दोन हजारांच्या नोटा चलनात आल्या. सुरुवातीला या नोटा वापरण्यात नागरिकांचा मोठा गोंधळ उडत असे. मात्र, काही महिन्यांनंतर तसेच वर्षांनंतर या नोटांचा रंग फिका पडत असल्याच्या अनेक तक्रारी बँकांकडे येऊ लागल्या. त्यात आता दहा, वीस, पन्नास, शंभर व दोनशे रुपयांच्यादेखील नवीन नोटा भारतीय चलनात दाखल झाल्या आहेत. परंतु, या नोटांचादेखील रंग उडून त्या नोटा फिक्या पडत असल्याच्या तक्रारी बँकांकडे येत आहेत.

नोटाबंदीनंतर नव्या पाचशे आणि दोन हजाराच्या नोटांचे प्रमाण वाढल्याने भारतीय बाजारांमध्ये सुट्या पैशांची मोठी चणचण भासू लागली होती. हेच लक्षात घेता रिझर्व बँकेने काही नवीन नोटा चलनात आणल्या; मात्र आता सुट्या पैशांचा त्रास कमी झाला असला तरीदेखील नोटांचा रंग उडत असल्याच्या तक्रारी ग्राहक बँकांमध्ये घेऊन येत आहेत. अनेकदा बँकांमध्ये या नोटा स्वीकारल्या जात नाहीत. त्यामुळे काही वादाचे प्रसंगदेखील उद्भवत आहेत.

दहा, वीस, पन्नास, शंभर व दोनशे रुपयांच्या नवीन नोटा भारतीय चलनात दाखल झाल्या आहेत. परंतु या नोटांचा रंग उडून त्या नोटा फिक्या पडत असल्याच्या तक्रारी बँकांकडे येत आहेत. रंग उडालेल्या नोटा बँकांकडून रिझर्व्ह बँक वर्षातून दोनदा घेते. याआधी पाचशे आणि दोन हजारच्या नोटांच्या तक्रारी बँकांकडे जास्त येत होत्या; मात्र आता दुसऱ्या नोटांच्या बाबतीतदेखील तक्रारी येत असल्याने बँकांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

रंग फिका पडलेल्या नोटा ग्राहक बँकांमध्ये घेऊन येत असले तरीदेखील बँकांकडे अशा नोटा मोठ्या प्रमाणात जमा नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्याचप्रमाणे अशा नोटा ग्राहक बँकांमध्ये घेऊन आल्यास बँका त्या नोटा स्वीकारत आहेत. ज्या वेळी नोटा छापण्यात आल्या त्या वेळी त्या नोटांचा दर्जा चांगला राखण्यात रिझर्व बँकेला अपयश आले आहे.

नोटाबंदीनंतर अत्यंत घाईगडबडीत नोटा छापण्यात आल्या. त्यामुळे सुरुवातीपासूनच या नोटांबाबत अनेक तक्रारी येऊ लागल्या. यामुळे ग्राहक बँकेत आल्यावर अनेकदा वाददेखील होतात. रिझर्व बँकेने सामान्य नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष देऊन यापुढील नोटा चांगल्या दर्जाच्या छापाव्यात.- देवीदास तुळजापूरकर, सरचिटणीस, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशन

टॅग्स :पैसा