माणसं घडवणाऱ्या ‘कोरो’ची पंचविशी
By Admin | Updated: September 6, 2015 00:20 IST2015-09-06T00:20:44+5:302015-09-06T00:20:44+5:30
चेंबूर, ट्रॉम्बे परिसरात साक्षरता अभियानांतर्गत काम करण्यासाठी १९८९ साली माधव चव्हाण, भीम रासकर, ज्योती म्हापसेकर, विलास सरमळकर, सुरेश सावंत आणि सुजाता खांडेकर एकत्र आले.

माणसं घडवणाऱ्या ‘कोरो’ची पंचविशी
- पूजा दामले
चेंबूर, ट्रॉम्बे परिसरात साक्षरता अभियानांतर्गत काम करण्यासाठी १९८९ साली माधव चव्हाण, भीम रासकर, ज्योती म्हापसेकर, विलास सरमळकर, सुरेश सावंत आणि सुजाता खांडेकर एकत्र आले. सरकारने सुरू केलेल्या साक्षरता अभियानांतर्गत या परिसरातील लोकांना साक्षर करण्यासाठी सहा जणांनी काम सुरू केले. वस्तीत काम करीत असताना साक्षरता म्हणजे फक्त लिहिता-वाचता येणे नाही, तर त्यापुढे जाऊन दैनंदिन आयुष्यातील व्यवहार आणि इतर सर्वच गोष्टींमध्ये साक्षरता आणण्याची आवश्यकता असल्याचे यांच्या लक्षात आले. पण ही साक्षरता, हे बदल घडवण्यासाठी वस्तीतल्या लोकांमध्ये बदल व्हायला हवा, हे प्रकर्षाने जाणवले. यातून प्रेरणा घेऊन २५ वर्षांपूर्वी कोरोची स्थापना झाली.
महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन राज्यांत सध्या ‘कोरो’ कार्यरत आहे. कोरोची स्थापना झाली तेव्हा यातील काही व्यक्ती या बाहेरून आल्या होत्या. पण कोरो पुढे गेली ती आतल्या म्हणजेच वस्तीतल्या लोकांमुळेच. हे कोरोच्या सचिव सुजाता खांडेकर आवर्जून सांगतात. कोरो ही आतल्या लोकांची संस्था आहे. १८ वर्षे कोरोने फक्त आणि फक्त ट्रॉम्बे परिसरात काम केले आहे. तिथले प्रश्न, तिथल्या व्यक्तींत बदल घडवणे, त्यासाठी त्यांना योग्य ती माहिती पुरवणे, त्यांना मार्गदर्शन करणे यावर कोरो काम करीत होती. काम करीत असतानाच त्या वस्तीतल्या व्यक्ती, तरुण कोरोशी जोडले गेले. यातूनच पुढे कोरोचा परिवार वृद्धिंगत होत गेला.
मदत ही कोणत्या तरी स्वरूपात करणे आणि मग संख्यात्मक आराखडा मांडणे, ही खरंच मदत अथवा बदल आहे का? संख्यात्मक मदत करण्यापेक्षा त्या व्यक्तीत बदल घडवून इतरांना मदत करण्यास सक्षम करणे हा खरा उद्देश आहे. कोरो हे याचे उत्तम उदाहरण आहे. वस्तीत काम करताना आलेला अनुभव, तिथे निर्माण झालेले प्रश्न, त्यावर उत्तर शोधताना करायला लागलेली धडपड, वस्तीत घडून आलेला बदल, त्यासाठी लागलेला वेळ या सगळ््या गोष्टी म्हणजे आमचा अभ्यास होता. आता मागे वळून पाहताना असे लक्षात येते, की संघटनेत रचनात्मक (बाहेरून आलेल्या लोकांची संघटना आतल्या लोकांची झाल़), संवादात्मक बदल झाले आहेत. आणि अंमल या गोष्टी प्रामुख्याने करण्यात आल्या, असे खांडेकर यांनी सांगितले.
वस्तीत काम करताना वैविध्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी पॅरा प्रोफेशन कोर्स सुरू करण्यात आला. या कोर्सच्या २५ बॅचेस झाल्या. १८ ते ३० वयोगटातील व्यक्तींसाठी हा कोर्स होता. यामुळेच नंतरचे प्रशिक्षण देण्यासाठी ही मुले पुढे यायची. कोरोने स्वत:चे उद्दिष्ट ठरवले होते, पण चाकोरी आखून घेतली नव्हती. यामुळे लोकांचे प्रश्न, समस्या समजून घेत त्या सोडवण्याचे प्रयत्न केले. त्यातूनच नवीन पद्धतीने बांधणी होत गेली.
महिलांना सक्षम करण्यासाठी महिला फेडरेशनची स्थापना करण्यात आली. आजघडीस फेडरेशनच्या ९ हजार महिला सदस्य आहेत. फेडरेशनच्या कार्यकारिणीसाठी यावेळी १५ पदांसाठी ७० महिला उमेदवार उभ्या होत्या. प्रत्येक उमेदवाराबरोबर प्रसिद्धीसाठी एक महिला कार्यरत होती. यावेळी एकूण १४० महिलांनी नेतृत्व करण्याची इच्छा दाखविली, हे कोरोचे यश आहे. कोरोमध्ये स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांना जे लोक तळागाळात काम करतात अशांनाच फेलोशिप देण्यात येते. आतापर्यंत महाराष्ट्रात ८६० जणांना, तर राजस्थानात ३३ जणांना फेलोशिप देण्यात आली आहे.
व्यक्तीची अंतस्थ प्रेरणा जागृत झाल्यावरच बदलाची सुरुवात होते. बाहेरून कितीही मार्गदर्शन, पाठबळ मिळाले तरीही बदल घडवून आणणे कठीण. पण ज्या क्षणी व्यक्तीला वाटते, ‘आता बदल हवा’ त्या क्षणी बदलाची प्रक्रिया सुरू होते. याच तत्त्वावर गेली २५ वर्षे ‘कमिटी आॅफ रिसोर्स आॅर्गनायझेशन्स (फॉर लिट्रसी)’ अर्थात ‘कोरो’ ही संस्था काम करीत आहे. अंतस्थ प्रेरणा जागृत झालेल्या ८६० जणांना फेलोशिप देऊन कोरोने तळागाळात बदल घडवून आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.