केमिकल कंपनीला भीषण आग
By Admin | Updated: March 25, 2015 22:59 IST2015-03-25T22:59:11+5:302015-03-25T22:59:11+5:30
रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे लगत पाली फाटा येथे असणाऱ्या रिलायन्स सिलिकॉन या केमिकल कंपनीला बुधवारी सायंकाळी भीषण आग लागली.

केमिकल कंपनीला भीषण आग
खालापूर : रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे लगत पाली फाटा येथे असणाऱ्या रिलायन्स सिलिकॉन या केमिकल कंपनीला बुधवारी सायंकाळी भीषण आग लागली.
आगीचे नेमके कारण अद्यापपर्यंत कळू शकले नाही, मात्र आग इतकी भीषण होती की कंपनीतील केमिकलने भरलेले ड्रम हवेत उडत होते. धुरामुळे काही काळ मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरची वाहतूक सुरक्षेच्या कारणासाठी थांबविण्यात आली होती. तर पाली-खोपोली राज्यमार्ग काहीकाळ बंद करण्यात आला होता. धुराचे लोट गडद असल्याने परिसरात अंधार निर्माण केला होता. कंपनीजवळ राहणाऱ्या लोकांना पोलिसांनी तत्काळ दुसऱ्या ठिकाणी हलविले आले. आगीत संपूर्ण कंपनी खाक झाली आहे. कोट्यवधी रुपयांचे नुकसान आगीत झाले आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. आग विझविण्यासाठी खोपोली अग्निशामक, रसायनी अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते.
कंपनीचे सर्व कामगार सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले असून कंपनीपासून काही अंतरावरील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. (वार्ताहर)