राज्यात सध्या मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबईच्या विक्रोळी परिसरातील एका दुकानदाराने मराठी भाषा आणि महाराष्ट्राबद्दल वादग्रस्त व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. या घटनेला आठवडा उलटला नाही, तोच मुंबई लोकलच्या महिला डब्यात जागेवरून पेटलेला वाद मराठी भाषेपर्यंत पोहोचल्याचे पाहायला मिळाले. या महिलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मुंबई लोकलच्या डब्यामध्ये महिलांमध्ये बाचाबाची सुरू आहे, यात एक महिला दुसऱ्या महिला प्रवाशाला "हा आमचा महाराष्ट्र आहे, मराठी येत नसेल तर बाहेर निघ!", असे बोलताना दिसत आहे.
नेमका वाद कशामुळे पेटला? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. मिळालेल्या माहितीनुसार, जागेवरून दोन महिलांमध्ये बाचाबाची झाली, असे सांगितले जात आहे.
त्यानंतर हा वाद भाषेपर्यंत पोहोचला आणि धावत्या लोकलमध्ये महिलांमध्ये दोन गट तयार झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.