सिडको अध्यक्षपदासाठी दिल्लीपर्यंत फिल्डिंग?
By Admin | Updated: May 20, 2015 00:45 IST2015-05-20T00:45:02+5:302015-05-20T00:45:02+5:30
राज्यातील श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडकोच्या अध्यक्षपदी वर्णी लागावी यासाठी इच्छुकांत जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.

सिडको अध्यक्षपदासाठी दिल्लीपर्यंत फिल्डिंग?
कमलाकर कांबळे ल्ल नवी मुंबई
राज्यातील श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडकोच्या अध्यक्षपदी वर्णी लागावी यासाठी इच्छुकांत जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यासाठी अनेकांनी दिल्लीपर्यंत फिल्डिंग लावली असून यात राजकीय मंडळींसह काही इस्टेट एजंट व बिल्डर्सही आघाडीवर आहेत. त्यासाठी काही कोटींची बोली लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राज्यात सत्तापालट होऊन सहा महिन्यांचा काळ उलटला आहे. तरीही सिडको अध्यक्ष आणि संचालकपदांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या नाहीत. येत्या पावसाळी अधिवेशनात याबाबतची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. सिडको महामंडळ भाजपकडे जाणार असल्याने पक्षातील आजी-माजी पुढाऱ्यांनी अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात नवी मुंबईसह मुंबई, ठाणे आणि रायगडमधील भाजपचे नेते आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे शहरातील काही बड्या बिल्डर्सनीही या पदासाठी कंबर कसली आहे. बांधकाम व्यवसायात बोलबाला असलेले नवी मुंबईतील दोन पटेल यात अग्रेसर असल्याचे समजते. त्यासाठी त्यांनी थेट दिल्लीत जाऊन भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी संधान बांधल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे काही इस्टेट एजंटनी नागपूर येथील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यालयातून या पदासाठी फिल्डिंग लावल्याची
चर्चा आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. विमानतळ प्रभावित क्षेत्रात (नैना) सिडकोच्या माध्यमातून एक नवीन शहर विकसित होणार आहे. विमानतळाच्या २५ किमी परिघात विकसित होणाऱ्या या नव्या शहराच्या विकासासाठी ६५,५५६ हेक्टर जमीन उपलब्ध होणार असल्याने भविष्यात सिडकोचे महत्त्व आणखी वाढणार आहे. ही बाब लक्षात घेऊन काही बड्या बिल्डर्सनाही सिडकोच्या अध्यक्षपदाचे वेध लागले आहेत. वाटेल ती किंमत मोजून हे पद मिळवायचेच, असा चंग काहींनी बांधला आहे. त्यामुळे या पदासाठी चुरस निर्माण झाली असून काही कोटी रुपयांची बोली लागल्याची
चर्चा आहे.