इच्छुकांची तिकिटांसाठी फिल्डिंग
By Admin | Updated: September 15, 2014 01:54 IST2014-09-15T01:54:33+5:302014-09-15T01:54:33+5:30
विधानसभेच्या रणसंग्रामाचा बिगूल वाजल्याने त्यासाठी गेल्या २-३ वर्षांपासून बाशिंग बांधून तयारीत राहिलेल्या इच्छुकांनी आता उमेदवारी मिळविण्यासाठी सर्वस्व पणाला लावले

इच्छुकांची तिकिटांसाठी फिल्डिंग
जमीर काझी, मुंबई
विधानसभेच्या रणसंग्रामाचा बिगूल वाजल्याने त्यासाठी गेल्या २-३ वर्षांपासून बाशिंग बांधून तयारीत राहिलेल्या इच्छुकांनी आता उमेदवारी मिळविण्यासाठी सर्वस्व पणाला लावले आहे; तर त्यांच्या समर्थकांकडून मतदारसंघातील कार्यकर्ते, तरुण मंडळांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली जात आहे. मुंबई शहर व उपनगरातील सर्व ३६ विधानसभा मतदारासंघांमध्ये सध्या अशी परिस्थिती असून, उमेदवारी निश्चित असलेल्यांनी जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती व तंत्रांच्या माध्यमातून नियोजन सुरू केले आहे.
केंद्रापाठोपाठ राज्यातही सत्तांतराची शक्यता गृहीत धरलेल्यांची महायुतीकडे तिकिटांसाठी रीघ लागली आहे; तर आघाडीमध्ये मात्र काँग्रेसकडे उमेदवारीसाठी इच्छुकांचे प्रमाण अधिक आहे. महानगरातील सेनेच्या वाट्यातील काही जागांवर भाजपा व आरपीआयच्या आठवले गटाकडून जोर लावला जात असल्याने त्या ठिकाणच्या महायुतीच्या नेत्यांमध्ये काहीसे तणावाचे वातावरण आहे. त्याचप्रमाणे सत्तारूढ काँग्रेस, राष्ट्रवादीमध्येही काही जागांच्या अदलाबदलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. येत्या आठवड्याभरात सर्व पक्षांकडून जागा व उमेदवारांची निश्चिती होण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रचाराला खऱ्या अर्थाने रंग चढणार आहे.
राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांमध्ये एकाचवेळी १५ आॅक्टोबरला मतदान होत आहे. यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये मुंबई, ठाण्यातील मतदान अखेरच्या टप्प्यात घेतले जात होते. त्यामुळे सर्व पक्षांची प्रमुख नेतेमंडळी उर्वरित महाराष्ट्रात प्रचाराचा धुरळा उडविल्यानंतर अखेरीला महानगरात पोहोचत असत. या वेळी परिस्थिती वेगळी असून, त्यांना एकाच टप्प्यामध्ये सर्व मतदारसंघांतील प्रचारसभांचे नियोजन करावे लागणार असल्याने त्यांची धावपळ होणार आहे.
राज्यात शुक्रवारपासून आचारसंहिता जाहीर झाल्यापासून सत्ताधारी आघाडीच्या मुंबईतील तीनही मंत्र्यांनी परजिल्ह्यातील दौऱ्याला फाटा दिला आहे. पक्षाकडून उमेदवारी कायम असल्याचा विश्वास असल्याने ते आपापल्या मतदारसंघांमध्ये थांबून निवडणुकीची व्यूहरचना करण्यात मग्न झाले आहेत. जनसंपर्क कार्यालय, प्रमुख मंडळाच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन जास्तीतजास्त लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत.