विळंगीत दरोडेखोराचा गोळीबार

By Admin | Updated: April 20, 2015 22:43 IST2015-04-20T22:43:37+5:302015-04-20T22:43:37+5:30

बंगल्यावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या दरोडेखोराशी झालेल्या झटापटीनंतर त्यांनी पिस्तूलातून झाडलेली गोळी छातीत लागल्याने

Fictitious robbery firing | विळंगीत दरोडेखोराचा गोळीबार

विळंगीत दरोडेखोराचा गोळीबार

पालघर : बंगल्यावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या दरोडेखोराशी झालेल्या झटापटीनंतर त्यांनी पिस्तूलातून झाडलेली गोळी छातीत लागल्याने विळंगी येथील ऋषीकेश शांताराम पाटील (३०) हे गंभीर जखमी झाले. यावेळी दरोडेखोर घरातील सोन्याचे दागिने पळविण्यात यशस्वी ठरला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सफाळे जवळील विळंगी येथील साईबाबा मंदिराजवळ राहणारे बिल्डर ऋषीकेश हे शनिवारी रात्रौ ८.३० वा. च्या दरम्यान आगरवाडी येथील मेडीकल स्टोअर्समधून औषधे खरेदी करून घरी आले. यावेळी आपली मोटरसायकल पार्क करून घराकडे जात असताना गॅरेजजवळील काळोखात दबा धरून बसलेल्या एका अज्ञात दरोडेखोराने आपल्या जवळील पिस्तुलातून दोन वेळा हवेत फायरींग करून ऋषीकेशकडे पैशाची व दागिन्याची मागणी केली. पिस्तुलाच्या फायरींगच्या आवाजाने बाहेर आलेल्या ऋषीकेशच्या आईच्या हातातील सोन्याच्या बांगड्या दरोडेखोराने काढून घेतल्या. यावेळी ऋषीकेशशी झालेल्या झटापटीत या दरोडेखोराने झाडलेली गोळी ऋषीकेशच्या छातीत घुसली व तो गंभीर जखमी झाला. यावेळी अज्ञात तरुणाने पळ काढला.
रविवारी आगरवाडीत ३-४ ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम असल्याने विलंगी येथील अनेक कुटुंबे लग्नात सहभागी होण्यासाठी बाहेर गेली होती. यावेळी ऋषीकेशच्या घरातही त्याचे आजारी वडील व आई दोघेच घरी असल्याची संधी साधून अज्ञात तरूणाने हा दरोड्याचा प्रयत्न केल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे. यावेळी ८० हजाराचे सोन्याचे दागिने चोरले गेले. किती दरोडेखोर होते, याबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात असताना केळवे पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात मृत्यू किंवा जबर दुखापत घडवून आणण्याच्या प्रयत्नासह दरोडा कलमान्वये भादवी ३९७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषिकेश यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांच्या छातीतील गोळी बाहेर काढल्याने त्याची प्रकृती स्थिर असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. पोलीसांनी अनेक ठिकाणी नाकाबंदी केली तरी त्यांना या दरोडेखोराला पकडण्यात यश मिळाले नव्हते. (वार्ताहर)

Web Title: Fictitious robbery firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.