मुंबईकरांसाठी ‘ताप’दायक वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:09 IST2018-04-28T00:09:24+5:302018-04-28T00:09:24+5:30
चटके आणखी वाढणार : विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा

मुंबईकरांसाठी ‘ताप’दायक वातावरण
मुंबई : मुंबईचे कमाल तापमान ३५ अंशाहून ३३ अंशावर घसरले असले, तरी प्रत्यक्षात मात्र समुद्री वारे स्थिर होण्यास दुपार उलटत आहे. परिणामी, मुंबईमधील वातावरण तप्त राहात असून, याचा फटका म्हणून मुंबईकरांना ‘ताप’दायक वातावरणाला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रही तापला असून, २८ एप्रिल ते १ मे दरम्यान विदर्भात उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. विशेषत: २७ एप्रिल ते २४ मे या कालावधीत राज्यातील वातवरण अधिकच उष्ण राहील. मध्य आणि पूर्व भागात अधिक उष्णता असेल. उत्तर-पश्चिम भागातही अधिकच उष्ण वातावरण राहील, अशी माहिती हवामान खात्याने दिली.
गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. २८ एप्रिल ते १ मे दरम्यान विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल. २८ आणि २९ एप्रिल रोजी मुंबईत आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २४ अंशाच्या आसपास राहील. अरबी समुद्राहून मुंबईकडे वाहणारे वारे सकाळी अकरापूर्वी स्थिर होणे गरजेचे असते. जर हे वारे दुपारी स्थिर झाले, तर मात्र दुपारच्या तप्त वातावरणामुळे वारे तापतात आणि मुंबईमधील वातावरण अधिक उष्ण जाणवू लागते. सद्यस्थितीमध्ये मुंबईकरांना अशाच काहीशा वातावरणाला सामोरे जावे लागत आहे.