महिला हिंसाचारविरोधी विभागाला मिळेना पूर्णवेळ अधिकारी!
By Admin | Updated: January 24, 2015 01:50 IST2015-01-24T01:50:06+5:302015-01-24T01:50:06+5:30
महिलांवरील होणारे हिंसाचार रोखण्यासाठी राज्य सरकारने मार्च २०१३ मध्ये जाहीर केलेल्या विशेष विभागाला अद्याप पूर्णवेळ पोलीस उपायुक्त मिळू शकलेला नाही.

महिला हिंसाचारविरोधी विभागाला मिळेना पूर्णवेळ अधिकारी!
डिप्पी वांकाणी - मुंबई
महिलांवरील होणारे हिंसाचार रोखण्यासाठी राज्य सरकारने मार्च २०१३ मध्ये जाहीर केलेल्या विशेष विभागाला अद्याप पूर्णवेळ पोलीस उपायुक्त मिळू शकलेला नाही.
दिल्ली येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी महिला हिंसाचारविरोधी सेलची घोषणा केली होती. बलात्कार, शोषण, हुंडा आणि घरगुती हिंसाचार यासारख्या महिला अत्याचाराविरोधात कारवाईची जबाबदारी असलेल्या या विशेष सेलला घोषणा झाल्यापासून पूर्णवेळ पोलीस उपायुक्त मिळू शकला नाही. या सेलची अन्य पूर्णवेळ जबाबदाऱ्या पार पाडत असलेल्या उपायुक्तांकडे देण्यात आली.
राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गेट वे आॅफ इंडिया परिसरात या सेलचा शुभारंभ केला होता. या सेलद्वारे महिला अत्याचाराशी संबंधित प्रकरणे केवळ महिला अधिकारीच हाताळतील
म्हणून यास तेव्हा मोठी प्रसिद्धी मिळाली होती. सुमारे ६५
पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या या सेलची जबाबदारी डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली.
तथापि, या सेलला शारदा राऊत यांच्या रुपाने पहिल्या पोलीस उपायुक्त मिळाल्या. मात्र, नंतर त्यांच्याकडे इतर विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला.
सध्या पोलिस उपायुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे या विभागाची जबाबदारी असून, त्यांच्याकडे अंमली पदार्थविरोधी सेलचाही पदभार देण्यात आलेला आहे. महिला हिंसाचारविरोधी सेलला पूर्णवेळ पोलिस उपायुक्त नाही. याबाबत पोलिस विभाग गंभीर नसल्याचे दिसून येते, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
च्यासंदर्भात मुंबई पोलीस दलाचे जनसंपर्क अधिकारी धनंजय कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पुर्णवेळ उपायुक्त नसला तरी विभागाचे काम जोमात सुरु असल्याचा दावा केला. चव्हाण हे अनुभवी अधिकारी आहेत आणि चालू वर्षी १० गंभीर प्रकरणांचा छडा लावण्यात सेलला यश आले आहे. तसेच अनेक प्रकरणांचा तपास करण्यात आला, असेही कुलकर्णी म्हणाले.
च्‘सध्या या सेलमध्ये एक एसीपी, एक निरीक्षक, दोन सहाय्यक निरीक्षक, दोन उप निरीक्षक आणि ३६ पोलीस कॉन्स्टेबल्स समावेश आहे. आयपीएस अधिकारी सुनिल पारसकर यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांचीही या सेलद्वारे चौकशी सुरु आहे. एका मॉडेलही पारसरकर यांच्याविरुद्ध ही तक्रार केली होती,’ अशी माहिती या सेलशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिली.