Join us
Daily Top 2Weekly Top 5

सायनमध्ये महिला डॉक्टरला मारहाण, रुग्णाच्या नातेवाइकांचे कृत्य, निवासी डॉक्टर संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 06:31 IST

रुग्णालय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास अत्यावश्यक सेवा विभागात एक रुग्ण काही नातेवाइकांसोबत आला.

मुंबई : कोलकात्यातील हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ देशभरातील निवासी डॉक्टरांनी आंदोलन पुकारले असतानाच रविवारी पहाटे सायन हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाइकांनी धिंगाणा घालत महिला निवासी डॉक्टरलाच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे डॉक्टर वर्गात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी सायन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.

रुग्णालय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास अत्यावश्यक सेवा विभागात एक रुग्ण काही नातेवाइकांसोबत आला. त्याचा चेहरा रक्ताने माखलेला होता. नाक आणि तोंडाला जबर मार बसला होता. शस्त्रक्रिया विभागातील निवासी डॉक्टरांनी रुग्णाला जुजबी बँडेज पट्टी करून अधिक उपचारासाठी कान-नाक-घसा विभागातील डॉक्टरकडे रुग्णाची रवानगी केली. विभागात त्यावेळी प्रथम वर्षाला शिकत असलेली महिला निवासी डॉक्टर होती.

संबंधित डॉक्टरने रुग्णाच्या नाका-तोंडावरील जखम पाहण्यासाठी एक बँडेज पट्टी उघडून पाहण्याचा प्रयत्न केला असता रुग्णाने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वाद सुरू झाला. रुग्णाच्या नातेवाइकांनी महिला निवासी डॉक्टरला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यात महिला नातेवाइकाचाही समावेश होता. त्यानंतर महिलेने निवासी डॉक्टरच्या तोंडावर रक्ताने माखलेली पट्टी भिरकावली. धक्काबुक्कीत महिला डॉक्टरच्या हाताला दुखापत झाली. त्यावेळी एकही सुरक्षा रक्षक तिथे उपस्थित नव्हता. 

हा प्रकार अतिशय गंभीर आहे. यामध्ये निवासी डॉक्टरला गंभीर दुखापत होऊ शकली असती. निवासी डॉक्टरांनी अशा असुरक्षित वातावरणात काम करायचे का? हा प्रश्न आहे. याप्रकरणी सायन पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.- डॉ. सुदीप ढाकणे, मार्ड, अध्यक्ष, सायन रुग्णालय.

टॅग्स :सायन हॉस्पिटल