Join us

कबुतरांना खायला दिले; ६८ हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:29 IST

कबुतरखाने बंद करण्यासाठी पालिकेकडून होत असलेल्या कारवाईला प्राणी संघटना, जैन समाज आणि काही नेत्यांकडून विरोध झाला. दुसरीकडे अनेक सामाजिक संघटनांनी या कारवाईला पाठिंबा दिला.

मुंबई : पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेला दिल्यानंतर आता पालिका त्याची अमंलबजावणी कशी करणार याकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे १३ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान कबुतरांना खाद्य देणाऱ्यांना ६८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.कबुतरखाने बंद करण्यासाठी पालिकेकडून होत असलेल्या कारवाईला प्राणी संघटना, जैन समाज आणि काही नेत्यांकडून विरोध झाला. दुसरीकडे अनेक सामाजिक संघटनांनी या कारवाईला पाठिंबा दिला. मात्र, मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पालिकेला या कारवाईवर निर्बंध आणावे लागणार आहेत. या मुद्यावर पालिकेला ७ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयातही बाजू मांडावी लागणार आहे. पालिकेने दादरच्या कबुतरखान्यावर बंदीसाठी चारही बाजूंनी ताडपत्री टाकली. त्यामुळे कबुतरांची उपासमार झाल्याचा आरोप होत असून, आता पालिका ती ताडपत्री हटवणार का? कंट्रोल फिडींगसाठी नागरिकांना विशेष मार्गदर्शक सूचना दिल्या जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या निर्देशांची अंमलबजावणी कशी करायची हे या सुनावणीनंतरच निश्चित होईल, असे संकेत आहेत. 

दादर कबुतखान्याकडून २२ हजारांचा दंड सध्या सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्यपदार्थ किंवा दाणे टाकण्यासाठी ५०० रुपयांचा दंड करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दादरच्या कबुतरखाना परिसरात १३ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान सर्वाधिक २२ हजाराहून अधिक दंड वसूल झाला आहे. 

टॅग्स :कबुतरमुंबई