चोख बंदोबस्ताने निर्भय मतदान
By Admin | Updated: October 16, 2014 01:07 IST2014-10-16T00:58:44+5:302014-10-16T01:07:41+5:30
मतदानाच्या अनुषंगाने पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता आणि संवेदनशील विभागांमध्ये पोलिसांतर्फे संचलन सुरू होते.

चोख बंदोबस्ताने निर्भय मतदान
नवी मुंबई : मतदानाच्या अनुषंगाने पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता आणि संवेदनशील विभागांमध्ये पोलिसांतर्फे संचलन सुरू होते. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईने बुधवारी मतदारांनी निर्भयपणे मतदान केले. नवी मुंबईत बेलापूर आणि ऐरोली या दोन मतदार संघांमध्ये यंदा मतदानाचा टक्का वाढला.
पोलीस आयुक्तालयातर्फे शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. या बंदोबस्तामध्ये केंद्रीय व राज्य राखीव दलाच्या तुकड्या होत्या.
मतदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून, गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण करण्यासाठी पोलिसांनी शहरात मार्चिंग केले. ऐरोली मतदार संघात संवेदनशील मतदान केंद्रे असलेल्या विभागांमध्ये देखील हे मार्चिंग करण्यात आले. त्यामध्ये २०० हून अधिक पोलीस कर्मचारी व राज्य राखीव दलाच्या तुकडीचा समावेश होता. पोलिसांच्या या मार्चिंगमुळे सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झालेल्या मतदारांनी निर्भयपणे मतदान केले. कोपरखैरणे, खारघर येथे पैसे वाटपाच्या संशयावरून व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र चौकशीअंती या प्रकारात काही निष्पन्न न झाल्याने त्यांना सोडून देण्यात आले. मंगळवारची रात्र देखील पोलिसांनी जागून घालवली. रात्रीत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी सर्वच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी गस्तीवर होते. परंतु मतदानापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाया करून पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्याने कोणताही अनुचित प्रकार शहरात घडला नाही.(प्रतिनिधी)