Join us
Daily Top 2Weekly Top 5

विषारी फुलांमुळे वांद्रे तलावाची पुरती ‘शोभा’ जलचरांचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 10:00 IST

वांद्रे येथील स्वामी विवेकानंद तलाव हा दिवसेंदिवस अधिक प्रदूषित होत असून, या तलावात वेगाने फोफावणाऱ्या विषारी फुलांमुळे तलावातील जलचरांचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.

मुंबई : वांद्रे येथील स्वामी विवेकानंद तलाव हा दिवसेंदिवस अधिक प्रदूषित होत असून, या तलावात वेगाने फोफावणाऱ्या विषारी फुलांमुळे तलावातील जलचरांचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. या विषारी फुलांमुळे वांद्रे तलावाची ‘शोभा’ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तलावाचे संवर्धन करण्यासाठी, तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने तत्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी वॉचडॉग फाउंडेशनने केली आहे.

जवळजवळ ७.५  एकर क्षेत्रात हा तलाव असून, त्यास सांस्कृतिक  महत्त्व आहे. हा तलाव हेरिटेज-२ या वर्गवारीत येतो. पूर्वी हा तलाव लोटस तलाव म्हणून ओळखला जात होता. त्याला मोठा सरोवर असेही म्हटले जाते. वांद्र्याच्या स्थानिक वारशाचे प्रतीक म्हणून तलाव ओळखला जातो.

मात्र, अलीकडच्या काळात या तलावातील प्रदूषण वाढले आहे. पाण्याचा रंगही बदलला आहे. वॉचडॉग फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी नुकतीच या तलावाची पाहणी केली. 

 या पाहणीत तलावातील प्रदूषण आणि त्यातील विषारी घटक वाढत असल्याचे निदर्शनास आले. हे प्रमाण चिंताजनक पातळीवर आले आहे.  

 तलावातील काही विषारी द्रवांमुळे सायनोबॅक्टेरियाचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे एकपेशीय वनस्पतींची वेगाने वाढ होऊन विषारी फुलांची निर्मिती होते. 

 या फुलांमुळे तलावातील जलचरांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते, याकडे लक्ष वेधण्यात आले. तलावातील प्रदूषण रोखण्यासाठी, तसेच संवर्धन करण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शक्य तेवढ्या लवकर तलावास भेट देऊन उपाय योजावेत, अशी मागणी फाउंडेशनने केली आहे.

टॅग्स :मुंबई