Join us
Daily Top 2Weekly Top 5

धारावीच्या गल्लीबोळांमध्ये साथीच्या आजारांचे सावट, तातडीने उपाययोजना करा; रहिवाशांची विनवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 16:06 IST

धारावीमध्ये क्षयरोग, मलेरिया, डेंग्यू आणि अतिसार या साथीच्या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत.

मुंबई

धारावीमध्ये क्षयरोग, मलेरिया, डेंग्यू आणि अतिसार या साथीच्या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. पावसाळ्यात तरी किमान या आजारांना थोपविण्यासाठी सुरुवातीपासूनच उपाययोजना करावी, अशी मागणी धारावीतील रहिवाशांनी केली आहे. 

धारावी पोलीस ठाण्याच्या मागे राहणाऱ्या अमिना बानू शेख सांगतात, माझ्या घराबाहेर गेली अनेक वर्षे गटार वाहते आहे. तिथे उंदीरच उंदीर आहेत. माझी मुले दिवसभर त्याच जागी खेळतात. माझ्या ११ वर्षांच्या मुलीला गेल्या वर्षी लेप्टोस्पायरोसिस झाला होता. धारावीतील ब्लॉक क्रमांक ५ चे रहिवासी अनिस म्हणाले, गल्लीगल्लीत मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टोचा धोका आहे. त्यामुळे मुले आजारी पडतात. 

डॉ. अनिल पाचनेकर यांच्या म्हणण्यांनुसार लेप्टोचा प्रश्न गंभीर आहे. कारण पाणी व ड्रेनेज व्यवस्थेचा अभाव आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचते, नाले तुंबतात. त्याच पाण्यात उंदीर, मांजरे आणि इतर प्राणी मूत्र विसर्जन करतात. त्या मूत्रात असलेल्या जीवाणूंमुळे जखमांतून संसर्ग होतो. 

डॉ. अमजद बाग यांनी सांगितले की, लोकांना आजारांपासून वाचवणे शक्य नाही. मुले अस्वच्छ रस्त्यांवर खेळतात. एवढ्या वर्षात काहीच बदललेले नाही. 

पायाला जखम असल्यास लेप्टोचा धोका अधिकजुलै ते सप्टेंबर दरम्यान लेप्टोस्पायरोसिस झपाट्याने पसरतो. उंदरांसारख्या संक्रमित प्राण्यांच्या मुत्रामुळे दूषित झालेल्या पाण्यातून हा आजार पसरतो. पावसाळ्यात अशा पाण्यातून चालताना विशेषत: पायाला जखम असणाऱ्यांना संसर्गाचा धोका अधिक असतो. 

आकडेवारी काय सांगते?महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण २०२४-२५ नुसार, लेप्टोस्पायरोसिसमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये २२५ टक्के वाढ नोंदविण्यात आली. २०२४ मध्ये राज्यात लेप्टोमुळे २६ मृत्यू झाले. २०२३ मध्ये केवळ आठ जणांचा मृत्यू झाला होता. मुंबईत ऑक्टोबर २०२४ पर्यंत १८ मृत्यू नोंदवले गेले. ९५३ रुग्णांची नोंद झाली.धारावी, कुर्ला आणि गोवंडी परिसरात अधिक रुग्ण आढळले होते.

टॅग्स :मुंबईधारावी