पाच लाखांहून अधिक किंमतीच्या प्रतिबंधित खाद्यपदार्थांवर एफडीएची कारवाई; चौघांविरोधात गुन्हा
By स्नेहा मोरे | Updated: October 26, 2023 20:15 IST2023-10-26T20:14:41+5:302023-10-26T20:15:01+5:30
या बेकायदा सुंगधी तंबाखू, गुटखा आणि पान मसाला अशा पदार्थांचा समावेश आहे.

पाच लाखांहून अधिक किंमतीच्या प्रतिबंधित खाद्यपदार्थांवर एफडीएची कारवाई; चौघांविरोधात गुन्हा
मुंबई - अन्न व औषध प्रशासनाने नुकतीच शहर उपनगरात प्रतिबंधित खाद्यपदार्थांवर कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, या कारवाईत एकूण ५ लाख २७ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून काही नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाने काळबादेवी परिसरातील अरुण गिरी पान शाॅप, जय जगन्नाथ पान स्टाॅल, काला पान भंडार या दुकानांवर कारवाई केली आहे, यातील एक दुकान एफडीएने सील केले आहे. या दुकानांतून तब्बल २० नमुने घेण्यात आले आहेत. तर तिन्ही दुकानांतून मिळून ३७ हजार ६६३ रुपयांचा साठा जप्त केला आहे. या बेकायदा सुंगधी तंबाखू , गुटखा आणि पान मसाला अशा पदार्थांचा समावेश आहे.
याखेरीस, कुर्ला पश्चिम येथील तीन दुकानांवर कारवाई केली आहे. या कारवाईत ४ लाख ९० हजार ३०४ किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. यात प्रतिबंधित खाद्यपदार्थांचे ३९ नमुने घेण्यात आले आहेत. या प्रकरणी आफताब आलम कमरुद्दीन खान (५०) व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुर्ल्यातील जावेद आलम जनरल स्टोअर, गोडाऊन आॅफ आफताब आलम कमरुद्दीन यांच्या दोन अशा एकूण तिन्ही दुकानांना सील करण्यात आल्याची माहिती एफडीएचे सहआयुक्त अन्न शैलेश आढाव यांनी दिली आहे.