Join us

सणाच्या पार्श्वभूमीवर एफडीए ‘अ‍ॅलर्ट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 04:35 IST

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने भेसळविरोधातील आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे.

मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने भेसळविरोधातील आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. त्यानुसार, अन्न पदार्थांचे उत्पादक आणि घाऊक विक्रेते यांची नियमित तपासणी करण्यात येत आहे. मुंबई शहर-उपनगरातून तीन लाख रुपयांचा खाद्यतेल, परराज्यातून येणारी बर्फी, शेव, खवा आणि फरसाण असा साठा जप्त केला आहे.एफडीएने राबविलेल्या मोहिमेत १९ व २० आॅक्टोबर रोजी बोरीवली येथे खाद्य उत्पादकावर धाड टाकून १ लाख २२ हजार ७८० किमतीचा साठा अप्रमाणित असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आला आहे. त्यातील खाद्यतेलाचे तीन नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. बोरीवली पश्चिम येथील उत्पादकाकडून धाड टाकून ६ हजार २४० रुपयांचा मलाई पनीर, दूध व खव्याचा साठा अप्रमाणित असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आला आहे. बंदर रोड येथे खाद्यतेल उत्पादकावर धाड टाकून १ लाख ३१ हजार २९५ रुपये किमतीचा खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे. खाद्यतेलाचे तीन नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. कुर्ला येथे मिठाई उत्पादकावर धाड टाकून १६ हजार ३३६ रुपये किमतीची स्पेशल बर्फी व माव्याचा साठा जप्त करून, दोन नमुने तपासणीसाटी पाठविले आहेत. धारावीत धाड टाकून २६ हजार ७५० रुपये किमतीचा फरसाण व शेवेचा साठा जप्त करून, दोन नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. दोन दिवसांत विभागाने मुंबईतील पाच ठिकाणांवर कारवाई करून १२ नमुने जप्त केले आहेत. याचा विश्लेषण अहवाल प्राप्त होताच, संबंधित अन्न व आस्थापनांवर नियमानुसार योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती एफडीएचे सहआयुक्त शैलेश आढाव यांनी दिली़सणासुदीच्या दिवसात भेसळ होण्याची शक्यता असल्यामुळे, सर्व ग्राहकांनी परवानाधारक व नोंदणीधारक आस्थापनांकडूनच अन्नपदार्थ खरेदी करावे, तसेच अन्न पदार्थांत भेसळ झाल्याचे आढळल्यास त्वरित तक्रार करावी, अशी माहिती मंत्री गिरीश बापट यांनी दिली़

टॅग्स :एफडीए