उत्तर प्रदेशात फय्याज शेख होता बेरोजगार
By Admin | Updated: September 21, 2015 02:24 IST2015-09-21T02:24:57+5:302015-09-21T02:24:57+5:30
कल्याणहून गेल्या वर्षी रहस्यमयरीत्या गायब झालेला फय्याज शेख (२१, नाव बदलले आहे) हा त्या काळात उत्तर प्रदेशातील गाझिपूर आणि गाझियाबाद जिल्ह्यांत काहीही काम न करता राहिला, असे स्पष्ट झाले आहे.

उत्तर प्रदेशात फय्याज शेख होता बेरोजगार
डिप्पी वांकाणी, मुंबई
कल्याणहून गेल्या वर्षी रहस्यमयरीत्या गायब झालेला फय्याज शेख (२१, नाव बदलले आहे) हा त्या काळात उत्तर प्रदेशातील गाझिपूर आणि गाझियाबाद जिल्ह्यांत काहीही काम न करता राहिला, असे स्पष्ट झाले आहे.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या फय्याजने जी ठिकाणे त्याच्या मुक्कामाची सांगितली होती, त्याची खातरजमा करून घेण्यासाठी दहशतवादविरोधी पथकाची (एटीएस) एक तुकडी तेथे पाठविण्यात आली होती. या तुकडीने एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या अहवालात ‘फय्याजने त्या दोन्ही जिल्ह्यांत कोठेही काम केले नाही,’ असे म्हटले आहे. कल्याणहून गेल्या वर्षी चार तरुण इस्लामिक स्टेट आॅफ इराक अॅण्ड सिरियाचे (इसिस) काम करण्यासाठी गेले होते. त्यातच कल्याणहून फय्याज शेख रहस्यमयरीत्या गायब झाला होता. शेखदेखील इसिसला जाऊन मिळाल्याचा कयास होता. सध्या फय्याज भिवंडीत पतपेढी चालवत आहे. फय्याज शेख गेल्या वर्षी कल्याणमधील चौधरी मोहल्ल्यातून गायब झाल्यापासून दहशतवादविरोधी यंत्रणा कशी सक्रिय झाली होती याचे वृत्त रविवारी ‘लोकमत’ने दिले. गेल्या आठवड्यात फय्याज समोर आल्यानंतर त्याने या कालावधीत तो कुठे-कुठे होता व त्याने काय केले याच्या दिलेल्या माहितीची खातरजमा एटीएस करीत आहे.
फय्याज ज्या महिलेसोबत पळाला होता, तिच्यासह फतेहपूर (जि. गाझिपूर) येथील फाया मंझीलमध्ये तो दोन महिने राहिला होता. ती त्याच्याहून सहा वर्षांनी मोठी असून त्यानंतर तो जवळपास वर्षभर रूपनगरमध्ये (जि. गाझियाबाद) राहिला. या दोन्ही ठिकाणी या दोघांनी आपली ओळख लपविली होती. आमच्या तुकडीने त्या दोन्ही ठिकाणांची सत्यता पडताळून पाहिली असून तेथील शेजाऱ्यांचे म्हणणेही नोंदवून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
त्या वेळी त्याच्या वडिलांनी तो घरातून ५ लाख रुपये घेऊन पळाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. फय्याजने त्याच्या आजोबांच्या खात्यातून ७-८ लाख रुपये काढले होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. फय्याज त्या काळात बेरोजगार होता आणि आता तो परतला आहे. तो सध्या त्याच्या कुटुंबीयांसोबत राहात नसून भिवंडीत भाड्याच्या घरात राहतो आहे. तो तेथे पतपेढी चालवीत आहे.
फय्याज इसिसमध्ये गेल्याचा जो कथित मुद्दा आहे त्यापुरती तुम्ही त्याला क्लीन चिट दिली का, असे विचारता सूत्रांनी तो जे काही सांगतो आहे त्याची शहानिशा व्हायला काही काळ जावा लागेल व प्रत्येक गोष्टीबद्दल आमचे समाधान झाल्यावरच आम्ही काही निष्कर्ष काढू, असे सांगितले.