Join us  

जबरदस्तीने क्वारंटाइन केल्याने वडिलांचा मृत्यू; घाटकोपरमधील रहिवाशाचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 4:30 AM

क्वारंटाइन सेंटरमधून एका व्हिडीओच्या माध्यमातून या कुटुंबीयांनी त्यांची व्यथा मांडली आहे. आम्ही आमच्या कुटुंबास सर्वांना होम क्वारंटाइन करण्यासाठी विनंती करत होतो.

मुंबई : घाटकोपरच्या गांगावाडी येथील शिवदास कांबळे या वृद्ध नागरिकाचा क्वारंटाइन सेंटरमध्ये मृत्यू झाला आहे. क्वारंटाइन सेंटरवर डॉक्टर वेळेत न पोहोचल्याने कांबळे यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. याप्रकरणी कुटुंबीयांनी स्थानिक राजकीय व्यक्ती, पोलीस व पालिकेला जबाबदार धरले आहे.

क्वारंटाइन सेंटरमधून एका व्हिडीओच्या माध्यमातून या कुटुंबीयांनी त्यांची व्यथा मांडली आहे. आम्ही आमच्या कुटुंबास सर्वांना होम क्वारंटाइन करण्यासाठी विनंती करत होतो. परंतु आमचे कोणीच ऐकले नाही व आझाद नगर येथे आम्हाला क्वारंटाइन करण्यास घेऊन गेले. परंतु या क्वारंटाइन सेंटरवर आम्हाला वेळेत जेवण मिळाले नाही, तसेच वेळेत डॉक्टर उपलब्ध झाले नाही यामुळे माङया वडिलांचा मृत्यू झाल्याचे शिवदास कांबळे यांच्या मुलाने आरोप केला आहे. कुटुंबातील इतर कोणाच्याही जीवितास धोका झाल्यास प्रशासन जबाबदार असेल असे या व्हिडीओमध्ये मृत कांबळे यांच्या मुलाने सांगितले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस