Join us  

"माझे लंडनचे तिकीट वडिलांनी काढले; सामंतांनी दिले पुरावे, पाहा तिकीट किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 12:55 PM

उदय सामंत यांनी लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं संबंधित करार झाल्याचा आणि वाघनघं जवळून पाहिल्याचा अनुभव कथन केला

मुंबई - लंडनमध्ये बुधवारी ढोल आणि ताशांच्या निनादात आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय ' या जयघोषात अतिशय स्फूर्तिदायक वातावरणात वाघनखं भारतात आणण्याच्या करारावर व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियमचे संचालक ट्रायस्टम हंट यांनी स्वाक्षरी केली. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तर, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सामंजस्य करारावेळी दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. या स्वाक्षरीनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून स्वानुभव सांगितला. यावेळी, नाव न घेता आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. 

उदय सामंत यांनी लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं संबंधित करार झाल्याचा आणि वाघनघं जवळून पाहिल्याचा अनुभव कथन केला. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं जवळून पाहताच अंगावर रोमांच उभा राहिला, असे सामंत यांनी म्हटले. तसेच, उद्योगमंत्री या लंडन दौऱ्याला जात असल्यावरुन शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरेंनी टीका केली होती. त्यावरुन, पलटवार करत सामंत यांनी त्यांच्या लंडन दौऱ्याच्या विमानाच खर्चही शेअर केला आहे. वडिलांनी माझे विमानाचे तिकीट काढले, त्याचा हा पुरावा म्हणत मंत्री सामंत यांनी फोटो शेअर केले आहेत.   

मी ज्यावेळी मुख्यंमंत्री शिंदे यांच्याबरोबर लंडनला जाण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी काही लोकांना प्रचंड दुःख झालं. मात्र, मी लंडनला जायचे निश्चित झाले आणि मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाला. त्यावेळी अनेकांनी टोमणे मारून टीका केली. मला सल्ले दिले की, मी देखील दौरा रद्द करावा. मात्र माझा दौरा निश्चित झाला. जे लोक आम्ही शासनाच्या पैशाने येथे आलोय अशी आमच्यावर टीका करत आहेत, त्यांना मी पुरावे देतो, असे म्हणत सामंत यांनी पुरावेच दिले आहेत. त्यानुसार, त्यांच्या लंडन दौऱ्यासाठी खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीला ५ लाख ८४ हजार ६८० रुपयांचा धनादेश तिकीट खर्चासाठी देण्यात आला आहे.

२७ सप्टेंबर २३ रोजी ट्रॅव्हल कंपनीला दिलेला धनादेश आणि त्याची पोच पावती सुद्धा आहे. संपूर्ण दौऱ्यात राहण्याचा आणि प्रवासाचा खर्च देखील मी स्वतः केलेला आहे. पण मी विचारलेल्या २०२२ च्या दावोस दौऱ्याच्या प्रश्नांची उत्तरे अजून मिळालेली नाहीत. पण, असो आता मी ते विचारणार नाही. जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा संबंधितांनी त्याची उत्तरे द्यावी, असेही सामंत यांनी म्हटले. माझ्यासाठी हा विषय संपला आहे. महाराष्ट्र २०१९ नंतर उद्योग जगतात पुन्हा पहिल्या क्रमांकावर आला आहे आणि भविष्यात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक टिकवण्यासाठी महायुती सरकार कसोशीने प्रयत्न करणार असे त्यांनी सांगितले. 

आदित्य ठाकरेंवर निशाणा

मुख्यमंत्र्यांनी मला परवानगी दिली, तेव्हा २७ तारखेलाच माझ्या वडिलांनी माझ्या लंडनच्या प्रवासाचे तिकीट काढले. त्याचा पुरावा, त्याचे चेक हे सगळे माझ्याकडे आहेत. काही लोक २०२२ ला एमआयडीसीचा काही संबंध नसताना ऊर्जामंत्री आणि पर्यटन मंत्री एमआयडीसीच्या खर्चाने परदेश दौऱ्यावर गेले हे कोणाला अजून सांगितले नव्हते ते सांगण्याची वेळ आली, असे सामंत यांनी नाव न घेता आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. 

३ वर्षे भारतात राहतील वाघनखं

शिवस्पर्श झालेली ही वाघनखं नोव्हेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२६ या तीन वर्षांच्या कालावधीकरिता भारतात राहतील. ही वाघनखं महाराष्ट्रातील विविध संग्रहालयात शिवप्रेमी, इतिहासप्रेमी नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार असून यात सातारा, नागपूर, कोल्हापूर येथील राज्य पुरातत्व विभागाच्या संग्रहालयांसह मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा समावेश राहणार आहे. 

टॅग्स :उदय सामंतशिवसेनाआदित्य ठाकरेलंडन