Join us

मुंबई टोलनाक्यांवर जानेवारीपासून फास्टॅग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 05:57 IST

पहिल्या आठवड्यापासून लागू होण्याची शक्यता

मुंबई : टोल नाक्यांवर होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी देशातल्या सर्व राष्ट्रीय महामार्गांवर भरण्यात येणारा टोल हा १५ डिसेंबरपासून फास्टॅगमार्फत भरण्यात यावा, असा निर्णय केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएसएआय) घेतला असला तरी मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोल नाक्यांवर अद्याप फास्टॅग उपलब्ध नाहीत. यासह मुंबईतील वांद्रे-वरळी सीलिंकवरही फास्टॅग उपलब्ध नाही. दरम्यान, सर्व राष्ट्रीय महामार्गांवर फास्टॅग लागू झाल्यावर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबईतील टोल नाक्यांवरही फास्टॅगची सुविधा उपलब्ध होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुंबईच्या एंट्री पॉइंटवर पाच ठिकाणी टोल नाके आहेत. त्यामध्ये वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस मार्ग आणि दहिसर अशा पाच ठिकाणच्या टोल नाक्यांसह वांद्रे-वर्सोवा सीलिंक या मार्गावरही टोल नाका असून हे सर्व टोलनाके महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) आहेत. या सहाही टोल नाक्यांवर अद्याप ‘फास्टॅग’ची सुविधा लागू करण्यात आलेली नाही. ही सुविधा राष्ट्रीय महामार्गावर लागू झाल्यानंतर मुंबईच्या टोल नाक्यांवरही लागू करण्यात येईल, असे एमएसआरडीसीने स्पष्ट केले आहे. वाहनधारकांनी आधीच एमईपीचे मासिक पास घेतल्याने फास्टॅग प्रणालीमुळे नाहक दुप्पट टोल वाहनधारकांच्या खिशातून जाईल, अशी भीती प्रवाशांमध्ये आहे. दरम्यान, टोल नाक्यांवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून केंद्राने राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांच्या सगळ्या लेन या फास्टॅग लेन करण्याचे ठरविले आहे.

‘फास्टॅग’ म्हणजे काय?फास्टॅगचे एक डिजिटल स्टिकर प्रत्येक वाहनावर चिकटविण्यात येणार असून ते संबंधित वाहनधारकाचे बँक खाते किंवा इतर खात्यासोबत लिंक असणार आहे. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करते. या प्रक्रियेमध्ये संबंधित वाहन टोल नाक्यावरून जाताना तेथील कॅमेऱ्यातील सेंसरमधून स्वयंचलित पद्धतीने वाहनधारकाच्या खात्यातून ही टोलची रक्कम कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना टोल भरण्यासाठी मोठ्या रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही.

टॅग्स :टोलनाका