Join us  

वेगवान राजकीय हालचाली, भाजपचा पुन्हा एकदा 'प्लॅन बी'

By यदू जोशी | Published: November 07, 2019 3:39 AM

सरसंघचालक-गडकरी भेटीवर बरेच काही अवलंबून, राष्ट्रपती राजवट टाळण्याचा प्रयत्न.

ठळक मुद्देसरसंघचालक-गडकरी भेटीवर बरेच काही अवलंबूनराष्ट्रपती राजवट टाळण्याचा प्रयत्न

यदू जोशी

मुंबई - भाजप- शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरता ठरत नाही अशी परिस्थितीत निर्माण झाली असताना आता भाजपने प्लॅन बी अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबतीने सरकार स्थापन करण्यासंदर्भात जोरदार हालचाली सुरू केल्या असल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली. तेव्हा केवळ शिवसेनेसोबत सरकार स्थापन होणार असेल, तर पुढे जा असे भागवत यांनी सांगितले होते. मात्र, बदलत्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करता येईल का यासंदर्भात बुधवारी मध्यरात्रीनंतर भाजपकडून हालचाली सुरु होत्या. 

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी हे गुरुवारी सकाळी सरसंघचालक भागवत यांची नागपुरात भेट घेणार आहेत. त्यावेळी ते राष्ट्रवादीसोबतच्या सत्तास्थापनेचा फॉर्मुला त्यांच्यासमोर मांडतील  आणि त्यास त्यांचा ग्रीन सिग्नल घेण्याचा प्रयत्न करतील असे समजते. शिवसेनेने अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा आग्रह कायम ठेवला आहे. भाजपचे दोन मोठे नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. बुधवारी मध्यरात्रीनंतरही भाजपला पाच वर्षांचे मुख्यमंत्रिपद देण्यासंदर्भात शिवसेनेकडून कुठलाही अनुकूल प्रतिसाद मिळाला नाही. तरीही शिवसेनेचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.सरसंघचालक आणि गडकरी यांच्या भेटीपूर्वी पर्यंत शिवसेनेकडून ग्रीन सिग्नल आला तर भाजप-शिवसेना सरकारचा मार्ग मोकळा होईल, पण तसा ग्रीन सिग्नल आला नाही तर राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्यासंदर्भात भागवत यांची परवानगी पुन्हा एकदा मागितली जाईल असे खात्रीलायक समजते. तशी परवानगी मिळाली नाही आणि शिवसेनेनेही पाठिंबा देण्यास नकार दिला तर भाजप सत्ता स्थापन करणार नाही. शिवसेनेला पाठिंबा न देण्याची भूमिका राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आधीच घेतली आहे. अशा परिस्थितीत राज्यात राष्ट्रपती राजवट अटळ असेल.

राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापनेचा ग्रीन सिग्नल मिळाला तर भाजप उद्या राज्यपालांकडे एकट्यानेच सत्तास्थापनेचा दावा करेल. सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपाल भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करेल आणि नंतर काहीच दिवसात राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देईल व सरकार  टिकेल असाही एक पर्याय ठरू शकतो.

आणि भेटीची वेळ बदललीभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार हे गुरुवारी सकाळी 10 वाजता राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी जाणार होते पण सरसंघचालक आणि गडकरी यांची ११ वाजता होणारी भेट तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची त्याचवेळी मुंबईत बोलावलेली बैठक या पार्श्वभूमीवर आता ते दुपारी 2 वाजता राज्यपालांच्या भेटतील. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बुधवारी मध्यरात्रीनंतरही जोरदार राजकीय खलबते सुरू होती. भाजपचे अनेक नेते वर्षावरच होते.

टॅग्स :नितीन गडकरीदेवेंद्र फडणवीसभाजपामोहन भागवत