सिडकोविरोधात तीव्र असंतोष

By Admin | Updated: June 8, 2015 04:16 IST2015-06-08T04:16:31+5:302015-06-08T04:16:31+5:30

गरजेपोटी बांधलेल्या घरांवर सुरू असलेली कारवाई व ४५ वर्षांतील प्रलंबित प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी ९ जूनला सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.

Fast dissatisfaction with CIDCO | सिडकोविरोधात तीव्र असंतोष

सिडकोविरोधात तीव्र असंतोष


नवी मुंबई : सिडकोविषयी प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. गरजेपोटी बांधलेल्या घरांवर सुरू असलेली कारवाई व ४५ वर्षांतील प्रलंबित प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी ९ जूनला सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. नवी मुंबई, पनवेलसह उरणमधील प्रकल्पग्रस्त या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.
न्यायालयाच्या आदेशानंतर सिडकोने नवी मुंबईमधील अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. या कारवाईविरोधात प्रकल्पग्रस्त कृती समितीने विरोध केला आहे. सर्वपक्षीय राजकीय व सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन सिडकोविरोधात लढा सुरू केला आहे. अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. सिडको पक्षपाती व अन्यायकारक कारवाई करत असल्याचा निषेध करण्यासाठी ९ जूनला मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाची जनजागृती करण्यासाठी गावनिहाय बैठका आयोजित केल्या जात आहेत. प्रकल्पग्रस्त कृती समितीने पत्रकार परिषद घेवून आंदोलनाविषयी माहिती दिली. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले नाही. शहराचे नियोजन करताना येथील गावठाण व ग्रामस्थांच्या सोयी-सुविधांचे नियोजन केले नाही. गावठाण विस्तार योजना राबविण्यात आली नाही. ४५ वर्षांत गरजेपोटी बांधण्यात आलेली घरे अनधिकृत ठरविली जात आहेत. सिडकोने पूर्वी २००७ पर्यंतची प्रकल्पग्रस्त रहात असलेली घरे नियमित करण्याचा निर्णय घेतला. नंतर व्यावसायिक बांधकामांसह सर्व घरे नियमित करण्याचा निर्णय घेतला. नंतर २०१२ पर्यंतची २० हजार घरे नियमित करण्याचा निर्णय घेतला. परंतु प्रत्यक्षात काहीच अंमलबजावणी केलेली नाही. गावठाणांपासून २०० मीटर अंतरावरील घरे पाडली जाणार नसल्याचे सांगितले. प्रत्यक्षात २०० मीटरची हद्दही ठरविण्यात आली नसून आता गावठाणांमधील घरेही पाडली जात आहेत.
नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांचा एकही प्रश्न आंदोलन केल्याशिवाय सुटला नाही. हक्कासाठी अनेक वेळा आंदोलन केले. रक्त सांडावे लागले आहे. आता पुन्हा सर्वपक्षीय पदाधिकारी राजकारण बाजूला ठेवून सिडकोविरोधात लढा उभारणार आहेत. न्यायालयाने ठाणे जिल्ह्णातील अतिक्रमणे पाडण्याचे आदेश दिले आहेत. परंतु सिडको फक्त प्रकल्पग्रस्तांची घरे पाडत आहे. सर्व प्रथम शासनाने आश्वासन दिलेली गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करावी, नंतर कारवाई करावी अशी भूमिका प्रकल्पग्रस्त नेत्यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडली. कारवाई थांबली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाणार असून वेळ पडली तर रक्त सांडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यावेळी प्रकल्पग्रस्त नेते श्याम म्हात्रे, मनोहर पाटील, डॉ. राजेश पाटील, नामदेव भगत, दशरथ भगत, वैभव नाईक, माजी महापौर सागर नाईक, द्वारकानाथ भोईर, नीलेश पाटील, रेवेंद्र पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Fast dissatisfaction with CIDCO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.