पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली?
By Admin | Updated: July 7, 2015 00:16 IST2015-07-07T00:16:09+5:302015-07-07T00:16:09+5:30
चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भात बियाण्यांची पेरणी केली. रोपेही चांगली आली. मात्र, आता पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली?
टोकावडे / बिर्लागेट : चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भात बियाण्यांची पेरणी केली. रोपेही चांगली आली. मात्र, आता पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
मान्सूनपूर्व पावसाने सर्वांचीच दाणादाण उडविली. यानंतर, पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी आनंदात होते. कृषी विभागाने श्रीराम, कर्जत आणि जया आदी भात बियाणे उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांची झुंबड उडाली. बघताबघता बियाणे संपले. वरुणराजाने कृपादृष्टी केल्याने भाताचे कल्याण तालुक्यात ५ हजार ६९२ हेक्टर क्षेत्र असून तालुक्यात बहुतांश गावांत पेरणी पूर्ण झाली. परंतु, आता पावसाने उघडीप दिल्याने रोपे सुकली आहेत. अशीच स्थिती राहिल्यास दुबार फेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येऊ शकते. मुरबाड तालुक्यात ठिकठिकाणी भाताची वाफे करपू लागली आहेत.
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
अंबाडी : गेल्या १५ दिवसांपासून पावसाने मारलेली दडी व पडत असलेले कडक ऊन यामुळे ठिकठिकाणची भातरोपे करपू लागली असून भिवंडी तालुक्यासह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार भातपेरणीचे संकट निर्माण झाले आहे. गेल्या पंधरवड्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. यादरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या भातपेरण्या आटोपून घेतल्या. मात्र, त्यानंतर पावसाने मारलेली दडी अद्याप कायम आहे. त्यामुळे पाण्याचे झरे सुकले, शेतीही कोरडी पडली आहे. या पार्श्वभूमीवर हलक्या जमिनीतील भातरोपे करपू लागली असून यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पावसाचे पुनरागमन न झाल्यास संपूर्ण भातरोपे होरपळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरीवर्गावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.