लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विहिरीचे काम मिळवून देतो असे सांगून यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील बँक ऑफ महाराष्ट्रात शेतकऱ्यांची खाती उघडण्यात आली आणि त्या माध्यमातून ७ कोटी रुपयांचा अपहार करण्यात आला आहे.
याप्रकरणी दोन जण फरार असून त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. याप्रकरणात बँक अधिकारी आणि पोलिसांचा सहभाग असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत सांगितले. आमदार राजू तोडसाम यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे सरकारचे या घोटाळ्याकडे लक्ष वेधले.
ही घटना ११ जुलै रोजी उघडकीस आली. १५ जणांचे बँक खाते आरोपींनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये उघडले. त्यांचे एटीएम कार्ड, पास बुक स्वतःकडे ठेवले आणि खात्यावरून दुसऱ्या खात्यांवर पैसे वळवण्यात आले आणि नंतर ते काढण्यात आले. खात्यातून वळवण्यात आलेल्या पैशांबाबत सायबर विभागाला तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगत ज्या शेतकऱ्यांच्या नावे खाती उघडली त्यांच्यावर कारवाई करणार नसल्याचे भोयर यांनी सांगितले.