राज्यपालांशी भेट न झाल्याने शेतकरी पुन्हा आझाद मैदानात रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:29 IST2021-02-05T04:29:03+5:302021-02-05T04:29:03+5:30

परिसराला छावणीचे स्वरूप : ड्रोनद्वारे नजर, राज्यपालांशी भेट न झाल्याने शेतकरी पुन्हा आझाद मैदानात रवाना लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई ...

The farmers left for Azad Maidan again as they did not meet the Governor | राज्यपालांशी भेट न झाल्याने शेतकरी पुन्हा आझाद मैदानात रवाना

राज्यपालांशी भेट न झाल्याने शेतकरी पुन्हा आझाद मैदानात रवाना

परिसराला छावणीचे स्वरूप : ड्रोनद्वारे नजर, राज्यपालांशी भेट न झाल्याने शेतकरी पुन्हा आझाद मैदानात रवाना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आझाद मैदान येथून राजभवनाच्या दिशेने निघालेल्या किसान मोर्चाला मेट्रो सिनेमाकडे पोलिसांनी अडविल्यामुळे वाद झाला. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर शेतकऱ्यांनी तेथेच ठिय्या आंदोलन केले. त्यात राज्यपाल नसल्याचे समजताच संतापात भर पडली. अखेर निराश झालेले शेतकरी निवदेन पत्र फाडून पुन्हा आझाद मैदानकडे रवाना झाले. यावेळी परिसराला छावणीचे स्वरूप आले हाेते.

मुंबईत रविवारी दाखल झालेल्या लाल वादळाच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा फाैजफाटा तैनात होता. सोमवारी आझाद मैदान येथे बैठक उरकल्यानंतर दुपारच्या सुमारास शेतकरी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्यासाठी राजभवनाकडे निघाले. यावेळी ड्रोनद्वारे सर्व घडामोडींवर पोलीस लक्ष ठेवून होते. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर १०० अधिकारी, ५०० अंमलदारांचा अतिरिक्त फाैजफाटा तसेच एसआरपीएफच्या ९ तुकड्या त्यांच्या दिमतीला तैनात होत्या. साध्या गणवेशातील पोलीसही मोर्चात सहभागी होऊन सर्व हालचालींवर लक्ष ठेवून होते.

फॅशन स्ट्रीटवरून मोर्चा मेट्रो सिनेमाकडे धडकताच पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांना अडविले. मात्र, तरीही काहींनी पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांना यावेळी सौम्य बळाचाही वापर करावा लागला.

सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी शेतकऱ्यांची समजूत काढली. अखेर मेट्रो सिनेमा परिसरात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.

दुसरीकडे राज्यपाल गोव्याला गेल्याचे समजताच, शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. अभिनेत्री कंगना रनाैतच्या भेटीसाठी वेळ आहे, मात्र शेतकऱ्यांसाठी वेळ नसल्याचा आराेप करत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. दरम्यान, विश्वास नांगरे पाटील यांनी मोर्चाच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून त्यांची समजूत काढली. काही जणांनी राजभवनात निवेदन देण्याचे ठरविले व ते पोलीस वाहनात बसले. मात्र, सर्वांनी एकत्र येऊन राज्यपाल नसल्याने राजभवनाकडे जाण्यास नकार दिला.

राज्यपाल येत नाहीत तोपर्यंत मेट्रो सिनेमा परिसरातच थांबण्याचा निर्णय आंदाेलकांनी घेतला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण हाेते. त्यानंतर राज्यपालांना देण्यात येणारे निवेदन फाडून त्यांचा निषेध करण्यात आला आणि मोर्चा पुन्हा आझाद मैदानाकडे रवाना झाला. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे कुठलाही अनुचित प्रकार यावेळी घडला नाही.

............................

Web Title: The farmers left for Azad Maidan again as they did not meet the Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.