कर्जतमध्ये शेतकर्‍यांचे उपोषण

By Admin | Updated: May 30, 2014 00:38 IST2014-05-30T00:38:07+5:302014-05-30T00:38:07+5:30

कर्जत तालुक्यातील कशेळे ग्रामीण रुग्णालयासाठी जमीन देणार्‍या शेतकर्‍यांनी उपोषण सुरु केले आहे .

Farmers' fasting in Karjat | कर्जतमध्ये शेतकर्‍यांचे उपोषण

कर्जतमध्ये शेतकर्‍यांचे उपोषण

कर्जत : कर्जत तालुक्यातील कशेळे ग्रामीण रुग्णालयासाठी जमीन देणार्‍या शेतकर्‍यांनी उपोषण सुरु केले आहे . नोकरीच्या हमीसाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असतांना त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कशेळे गावामध्ये तणावाचे वातावरण असून निद्रा अवस्थेत असलेल्या आरोग्य विभागाला जागे करण्यासाठी शुक्रवारी कर्जत - मुरबाड राज्य मार्ग रोखून धरण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. दरम्यान, चार दिवसात एकही सरकारी अधिकारी कशेळे उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी पोहचला नसल्याने संतप्त भावना व्यक्त होत आहेत. कशेळे येथे ग्रामीण रुग्णालय बांधण्यासाठी राज्य सरकारला गावातील अनेकांनी आपल्या जमिनी दिल्या . त्याबदल्यात प्रत्येक घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन आरोग्य विभागाने वीस वर्षापूर्वी दिले होते. मात्र आश्वासन पाळले जात नसल्याने रुग्णालयासाठी जमीन देणार्‍या चार शेतकर्‍यांनी जानेवारी महिन्यात उपोषण सुरु केले होते. त्यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय आणि कशेळे ग्रामीण रु ग्णालय यांनी साठ दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले होते . त्याबाबत निर्णय होत नसल्याने अखेर सव्वीस मेपासून रुग्णालयासाठी जमीन देणारे अशोक तुकाराम बोराडे ,कमलाकर सदु ठोंबरे ,रघुनाथ बाबू शेळके आणि विष्णुप्रसाद गौर यांनी उपोषण सुरु केले होते . उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी दोघांची प्रकृती खालावल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले . काल तिसर्‍या दिवशी अन्य दोघांना देखील ग्रामीण रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र या तीन दिवसांच्या काळामध्ये एकही सरकारी अधिकारी कर्जत अथवा अलिबाग येथून उपोषणकर्त्यांची विचारपूस करण्यासाठी कशेळे येथे पोहचला नाही . त्यामुळे संतापलेल्या चारही उपोषणकर्त्यांनी आज उपोषणाच्या चौथ्या दिवशी कोणतेही वैद्यकीय उपचार न घेण्याचा निर्णय घेवून जोवर नोकरी लागत नाही ,तोवर उपोषण सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे .गावातील सर्व ग्रामस्थ यांचा उपोषण कर्त्यांना पाठींबा असल्याने आरोग्य विभागाविरुद्ध प्रचंड चीड निर्माण झाली आहे. उपोषणकर्त्यानी आंदोलन अजूनच तीव्र केले असुन उपचार घेण्यास नकार दिला आहे.

Web Title: Farmers' fasting in Karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.