शेतक-यांची फरपट अनुल्लेखाने मारता येणार नाही - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: February 3, 2015 08:48 IST2015-02-03T08:48:24+5:302015-02-03T08:48:32+5:30
विदर्भ, मराठवाडा किंवा कोकण, शेतकरी कुठलाही असो, त्याची परवड व फरपट सर्वत्र सारखीच असून ती अनुल्लेखाने मारता येणार नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

शेतक-यांची फरपट अनुल्लेखाने मारता येणार नाही - उद्धव ठाकरे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - महाराष्ट्रातील शेतक-यांच्या आत्महत्यांच्या मुद्यावरून सेना- भाजपमध्ये चांगलीच लढाई जुंपली आहे. सामनाच्या अग्रलेखातून प्रश्न विचारत सेनेने केलेला टीकेचा वार मुख्यमंत्र्यांनी अनुल्लेखाने परतवल्यावर सेनेने पुन्हा एकदा भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. विदर्भ, मराठवाडा किंवा कोकण, शेतकरी कुठलाही असो, त्याची परवड व फरपट सर्वत्र सारखीच असून ती अनुल्लेखाने मारता येणार नाही. ज्याला मन व संवेदना आहेत तो प्रत्येकजण शेतकर्यांचे अश्रू आणि फरफट बघून हळहळल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व भाजपावर हल्ला चढवला आहे.
सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखातून पुन्हा एकदा शेतक-यांच्या आत्महत्यांचा विषय उचलून धरण्यात आला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे संभाजीनगरच्या दौर्यावर असताना आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या भेटीस गेले. ' गारपिटीचा तडाखा बसला आहे, पण यावर आत्महत्या हा उपाय नाही. शेतकर्यांनो, जिवाचे बरेवाईट करून घेण्यापूर्वी कुटुंबाचा, मुलाबाळांचा विचार करा,’ असे आवाहन त्यांनी केले, असे अग्रलेखात म्हटले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात आत्महत्या सुरू असताना कोकणातही आत्महत्यांचे लोण पसरू लागले आहे. शेतकरी विदर्भाचा असो, मराठवाड्याचा असो नाही तर कोकणातला, त्याची परवड व फरफट सर्वत्र सारखीच आहे. ही फरफट दुर्लक्षित करून चालणार नाही किंवा अनुल्लेखाने मारता येणार नाही. ज्याला मन आहे व संवेदना आहेत तो प्रत्येकजण शेतकर्यांचे हे अश्रू आणि फरफट बघून हळहळल्याशिवाय राहणार नाही. आदित्य ठाकरेंनी मराठवाड्यातील शेतकर्यांचे प्रश्न जाणून घेतले. आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू पुसले व त्यांची फक्त वेदनाच समजून घेतली त्यांना मदतही केली. त्यामुळे गेलेले जीव परत येणार नाही, पण शेवटी ज्यांनी मतदान करून सत्तेवर आणले त्यांच्या दु:खात पाठीशी उभे राहून जमेल तितके सहाय्य करणे कर्तव्य आहे, असा टोलाही त्यांनी भाजपा सरकारला लगावला.