वाढीव दराने भाडे आकारणी

By Admin | Updated: August 18, 2014 01:32 IST2014-08-18T01:32:19+5:302014-08-18T01:32:19+5:30

इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये कॅलिब्रेशन केल्याशिवाय नवीन भाडेवाढ लागू करू नये,

Fare rates at increased rates | वाढीव दराने भाडे आकारणी

वाढीव दराने भाडे आकारणी

नवी मुंबई: इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये कॅलिब्रेशन केल्याशिवाय नवीन भाडेवाढ लागू करू नये, असे स्पष्ट निर्देश असतानाही सायबर सिटीतील काही रिक्षा चालकांकडून आतापासूनच प्रवाशांकडून नवीन दराने भाडे आकारण्याचे प्रकार सुरू आहेत. यासंदर्भात प्रवाशांच्या तक्रारी वाढत आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या मंगळवारी रिक्षा भाडेवाढीला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे आता रिक्षाचे किमान भाडे १५ रुपयांवरून १७ रुपये इतके करण्यात आले आहे. असे असले तरी ही नवीन भाडेवाढ लागू करण्यासाठी रिक्षांच्या मीटरमध्ये रिकॅलिब्रेशन करणे गरजेचे आहे.
त्याशिवाय नवीन भाडे आकारणी करू नये, अशा स्पष्ट सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. त्यासाठी ३१ नोव्हेंबर म्हणजेच ४५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. असे असले तरी काही रिक्षा चालकांनी आतापासूनच वाढीव दराने भाडे आकारायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे मीटरमध्ये किमान भाडे १५ रुपये दाखवत असताना प्रवाशांकडून १७ रुपये दराने भाडे मागितले जाते. त्यामुळे प्रवासी व रिक्षा चालकांत वाद होत आहेत. यासंदर्भात अनेक तक्रारी आल्याने आरटीओने अशा रिक्षा चालकांना कारवाईची तंबी दिली आहे.
नवीन दराने भाडे आकारण्यासाठी मीटर रिकॅलिब्रेशन करणे गरजेचे आहे. यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आरटीओ अधिकारी संजय धायगुडे यांनी शनिवारी रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींची एक बैठक बोलाविली होती.
न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व रिक्षा चालकांनी दिलेल्या मुदतीच्या आत आपल्या रिक्षाच्या मीटरमध्ये रिकॅलिब्रेशन करून घ्यावे. मंगळवारपासून सुट्टीच्या दिवशी सुध्दा रिकॅलिब्रेशनसाठी आरटीओ कार्यालय सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती धायगुडे यांनी या बैठकीत दिली. त्यामुळे रिक्षा चालकांनी रिकॅलिब्रेशन केल्याशिवाय वाढीव भाडे आकारू नये. मीटरवर जे भाडे दर्शविले जाते, तेच भाडे प्रवाशांकडून आकारावे. याचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर नियमाने कारवाई केली जाईल, असे धायगुडे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Fare rates at increased rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.