मुंबई : प्रसिद्ध चित्रकार रामचंद्र उर्फ रामइंद्रनील कामत (४१) हे गुरुवारी माटुंगा येथील राहत्या घरी बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळले. घटनास्थळावर सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये ‘माझ्या मृत्यूस कुणालाही जबाबदार धरू नये,’ असा उल्लेख आहे. त्यानुसार, त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे.चित्रकार तसेच छायाचित्रकार असलेले कामत माटुंगा येथील पलाई हाउसमध्ये आईसोबत राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घरातील बाथटबमध्ये ते बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना सायन रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान केले.शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. प्राथमिक तपासात तसेच सुसाइड नोटच्या आधारे पाण्यात बुडाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. त्यांनी टोकाचे पाऊल का उचलले, हे शोधण्यासाठी कुटुंबीय आणि मित्रांचा जबाब नोंदवला जाणार असल्याचे माटुंगा पोलिसांनी सांगितले.>सोशल मीडियावरील पोस्ट, संवाद ठरला अखेरचाकामत हे सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असायचे. त्यांनी १८ आॅगस्टला शेअर केलेल्या कलेबाबत त्यांचे कौतुक झाले. यात त्यांनी शांततेचा उल्लेख करत अखेरच्या ओळीत, ‘जेव्हा तुम्ही हरवत जाता, तेव्हा त्यात स्वत:ला शोधू लागता,’ असे नमूद केले. या वेळी एका मैत्रिणीशी संवाद साधताना लवकरच नवीन काही तरी करण्याचा विचार त्यांनी व्यक्त केला होता. या वेळी, ‘आपण एकत्र काही तरी केले पाहिजे. उशोशी सेनगुप्ता सुंदरबनबरोबर काही काम करत आहेत. कदाचित त्यासाठी आपण काही तरी मनोरंजक केले पाहिजे’, असे त्यांनी नमूद केले होते. सोशल मीडियावरील त्यांची ही पोस्ट आणि संवाद अखेरचा ठरला.
धक्कादायक! प्रसिद्ध चित्रकार रामचंद्र कामत यांचा बाथटबमध्ये आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 07:12 IST