Join us  

देशाला पहिला ऑस्करचा मान पटकावून देणाऱ्या मराठमोळ्या भानू अथैय्या यांचं निधन

By मुकेश चव्हाण | Published: October 15, 2020 8:27 PM

भानू अथैय्या यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

मुंबई/कोल्हापूर: 1982 मध्ये रिचर्ड अँटेनबरोच्या जगप्रसिद्ध चित्रपट 'गांधी'साठी सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनरचा पुरस्कार जिंकणार्‍या भानु अथैय्या यांचे मुंबईतील कुलाबा येथील घरी दीर्घ आजाराने निधन झाले.  भारतासाठी त्यांनी पहिला ऑस्कर पुरस्कार मिळवून दिला होता. भानू अथैय्या मूळच्या कोल्हापूरच्या असून त्यांचं नाव भानुप्रिया राजपक्षे असं आहे.

भानू अथैय्या यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या ऑस्कर पुरस्कार विजेत्या व नामांकित कॉस्च्युम डिझायनर भानू अथय्या यांचे निधन झाले.त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतील आणखी एका दिग्गज कलावंत काळाच्या पडद्याआड गेला, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी  श्रद्धांजली वाहिली आहे.

भानु अथैय्या आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑस्कर पुरस्काराने सन्मानित झालेले पहिले भारतीय व्यक्तिमत्व होते. 'गांधी' चित्रपटासाठी वेशभूषा डिझाईनर म्हणून त्यांनी जॉन मोलो यांच्यासमवेत सर्वोत्कृष्ट वेशभूषा डिझाइनरचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटाला एकूण आठ ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे भानु अथैय्या यांनी कॉस्च्युम डिझायनर म्हणून 1956 साली गुरू दत्त दिग्दर्शित ‘सीआयडी’ चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यांनी गुरु दत्तच्या 'प्यासा', 'चौधवी का चंद' आणि 'साहिब बीवी और गुलाम' या चित्रपटासाठी कॉस्ट्यूम डिझाइन केले होते.

टॅग्स :कोल्हापूरमुंबईमहाराष्ट्र