Join us  

मुंबईतले हे प्रसिद्ध कॉलेज फेस्ट विद्यार्थ्यांमध्ये आहेत लोकप्रिय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 5:05 PM

मुंबईतील या कॉलेजच्या फेस्टमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होतात.

ठळक मुद्देअनेक विद्यार्थ्यांसाठी तर हे कॉलेज फेस्टच सर्वस्व असतात.अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या कॉलेजच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक बक्षिसं जिंकून आणतात.आपला सर्वांगिण विकास करण्यासाठी अश्या फेस्टमध्ये भाग घेणं किंवा आयोजन करणं गरजेचं असतं.

मुंबई : कॉलेजमधले  फेस्टिव्हल्स म्हणजे कॉलेजिअन्सचे जीव की प्राण. आपला फेस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही तरुण मंडळी प्रचंड मेहनत घेतात. दोन ते तीन दिवसाच्या फेस्टसाठी चार ते पाच महिन्यांपासून तयारी सुरू असते. फेस्टमध्ये स्पर्धा काय ठेवायच्या, कोणाला बोलावयचं, स्पर्धेचे परीक्षक कोणाला नेमायचे, अशी कितीतरी कामं हीच मुलं पार पाडतात. एव्हाना अनेक कॉलेजमध्ये फेस्टसाठी हालचाल सुरूही झाली असेल. दिवाळी संपली की सगळ्या कॉलेजमध्ये फेस्टचे वारे वाहू लागतात. काही विशिष्ट कारणांसाठी ही फेस्टिव्हल्स इतर कॉलेजमध्येही फार प्रसिद्ध असतात. अमुक एका कॉलेजच्या फेस्टमध्ये आपल्याला पारितोषिक मिळालं हे कॅम्पसमध्ये सांगणं विद्यार्थ्यांसाठी अभिमानाचं असतं. त्याचप्रमाणे अशा फेस्टमध्ये काम केल्याने व्यवस्थापन कौशल्य, संवाद कौशल्य, वेळेचं नियजोन या सगळ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. अशाच काही प्रसिद्ध फेस्टविषयी आज आपण पाहुया. 

मूड इंडिगो

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी बॉम्बे या महाविद्यालयाचा मूड इंडिगो हा फेस्ट देशभरात फार प्रसिद्ध आहे. देशभरातल्या विविध विद्यापीठातील विद्यार्थी सहभाग घेत असतात. नृत्य, गाणी, नाटक, टॅलेन्ट शो, फॅशन शो इकडे होत असतात. हा फेस्ट देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असल्याने यांना अनेक प्रायोजकही मिळत असतात. आशिया खंडातील सगळ्यात मोठा कार्यक्रम या कॉलेजमध्ये होत असल्याने भारतातील अनेक दिग्गज मंडळीही इकडे येत असतात. तसंच अनेक माध्यमांचंही फेस्टिव्हलकडे लक्ष असतच. 

मल्हार

सेंट झेव्हियर्स कॉलेजचा मल्हार हा इव्हेंट मुंबईतल्या कॉलेजिअन्समध्ये फार प्रसिद्ध आहे. यंदा ऑगस्टच्या १२ ते १४ तारखेपर्यंत हा फेस्ट रंगला. मुंबईतल्या इतर फेस्टच्या आधी हा फेस्ट येत असल्याने दरवर्षीच मल्हारच्या थीमची चर्चा कॅम्पसमध्ये  रंगू लागते.  उत्कृष्ट कम्यूनिकेशन कौशल्य तुमच्याकडे असेल तर त्या कौशल्याला उत्तम व्यासपीठ या मल्हारच्या इव्हेंटमधून मिळू शकतं, कारण इकडे त्याप्रकारच्याच अनेक स्पर्धांचं आयोजन केलं जातं. या फेस्टमध्ये भाग घेण्यासाठी मुंबईतील अनेक कॉलेजच्या मुलांची धडपड सुरू असते. 

टेक्नोवांझा

वीरमाता जीजाबाई टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूतर्फे आयोजित केलेला टेक्नोवांझा इव्हेंट टेक्नोसेव्ही विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असतो. मुंबई आणि मुंबई नजीकच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधील जवळपास २५ हजाराहून अधिक विद्यार्थी या फेस्टला येत असतात. २६ ते २८ डिसेंबर दरम्यान यंदा हा फेस्ट होणार आहे. २००० सालापासून सुरू झालेला या फेस्टचा उद्देशच समाजातील लोकांना टेक्नोलॉजीची ओळख करून देण्याचा आहे. अनेक तंत्रप्रेमी या फेस्टला आवर्जून उपस्थित राहत असतात. देशभरातील अनेक विद्यार्थी इकडे आपल्या कौशल्याचं लोकांसमोर मांडतात.

उमंग

नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स म्हणजेच एन.एम कॉलेजचा उमंग हा इव्हेंट. अनेक क्रिएटीव्ह इव्हेंट या फेस्टच्या अंतर्गत आयोजित केल्या जातात. हा इव्हेंटही ऑगस्ट महिन्याच्या दरम्यानच आयोजित केला जातो. यंदा १५ ते १७ ऑगस्ट दरम्यान हा इव्हेंट पार पडला. या फेस्टीव्हलच्या नावाप्रमाणेच हा फेस्ट आहे. वेगवेगळी कलाकृती, क्रिएटीव्ह करण्यासाठी उमंग हे उत्तम व्यावसपीठ मुंबईच्या विद्यार्थ्यांकडे आहे. या फेस्टच्या स्पर्धांची नावंच इतकी आकर्षक असतात की त्यात सहभागी व्हावं असं प्रत्येकालाच वाटेल.

क्षितीज

मिठीबाई कॉलेजचा क्षितीज हा फेस्टिव्हलही मुंबईत टॉपला आहे. अनेक बॉलिवुड कलाकार या फेस्टला हजेरी लावत असल्याने हा फेस्ट दिवसेंदिवस अधिक प्रसिध्द आणि व्यापक होत जातोय. ७ ते १० डिसेंबर दरम्यान यंदा फेस्ट होणार आहे. दरवर्षी ४० हजाराहून अधिक विद्यार्थी या फेस्ट उपस्थित असतात. जवळपास ७०० विद्यार्थ्यांच्या मेहनतीने हा फेस्ट साजरा होत असतो. इतर फेस्टप्रमाणे यांच्याकडेही आकर्षक स्पर्धांची रेलचेल असते. यंदाही त्यांचा इव्हेंट हटके होणार आहे. त्याच्यासाठी त्यांनी मेहनत सुरू केली असून अनेक फेस्टच्या दिवसाची ते वाट पाहताहेत. 

सर्व फोटो - प्रातिनिधीक

टॅग्स :मुंबईमहाविद्यालयविद्यार्थी