Join us

कुटुंबाचा आधार गेला; २० हजार मिळाले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 12:40 IST

दारिद्रयरेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असलेल्या १८ ते ५९ वयोगटांतील कर्ता स्त्री-पुरुष मृत्यू झाल्यास राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत कुटुंबीयांना एकरकमी २० हजार रुपये दिले जातात. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दारिद्रयरेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असलेल्या १८ ते ५९ वयोगटांतील कर्ता स्त्री-पुरुष मृत्यू झाल्यास राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत कुटुंबीयांना एकरकमी २० हजार रुपये दिले जातात. 

अंधेरी तालुक्यात लाभार्थी निकषांत बसत नसल्याने २०१७ पासून एकाही लाभार्थीला एकरकमी २० हजार रुपये मिळाले नाहीत. राष्ट्रीय कुटुंब लाभयोजनेत कुटुंबीयांना एकरकमी २० हजार रुपये मिळण्यासाठी संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना कक्षात इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

काय आहे कुटुंब लाभ योजना?

केंद्र सरकारकडून राष्ट्रीय कुटुंब लाभयोजना मुंबई उपनगर जिल्ह्यात राबविण्यात येते. या योजनेद्वारे १८ ते ५९ वयोगटांतील कर्ता स्त्री-पुरुषाचा मृत्यू झाल्यास राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत कुटुंबीयांना एकरकमी २० हजार रुपये दिले जातात. या योजनेतील लाभार्थी कुटुंबाचा समावेश मात्र दारिद्र्यरेषेखालील यादीत असणे अपेक्षित आहे. याशिवाय मृत्यू झालेल्या कर्त्या स्त्री-पुरुषाचे १८ ते ५९ वयोगटांतील वय असणे अपेक्षित आहे.

...तर योजना कागदावरच

शासनाने बिलो पॉवरची उत्पन्नाची मर्यादा वाढवल्यानंतरच मुंबईतील अधिकाधिक जनतेला या योजनेचा लाभ घेता येईल. योजनेसाठी ४० हजार वार्षिक उत्पन्न ठेवण्यात आले. वाढती महागाई लक्षात घेऊन शासनाने उत्पन्नाची मर्यादा किमान एक लाख रुपये करावी, तरच या योजनेचा लाभ गरजूंना मिळेल. अन्यथा मुंबईत तरी ही योजना कागदावरच राहण्याची शक्यता आहे, असे नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुनील कुमरे यांनी सांगितले.

अंधेरी तालुक्यात लाभार्थी निकषांत बसत नसल्याने २०१७ पासून एकाही लाभार्थीला या योजनेचा लाभमिळाला नाही. - स्नेहलता स्वामी, तहसीलदार, अंधेरी तालुका

 

टॅग्स :मुंबई