कौटुंबिक बंध होताहेत शिथिल
By Admin | Updated: July 13, 2015 22:51 IST2015-07-13T22:51:30+5:302015-07-13T22:51:30+5:30
मागील पंधरा दिवसांत हरवलेल्या अल्पवयीन मुलींनी पोलिसांचा चांगलाच घाम काढला आहे. मुलगी हरवल्याची तक्रार येताच गांभीर्याने तिचा शोध घेण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागत आहे.

कौटुंबिक बंध होताहेत शिथिल
सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
मागील पंधरा दिवसांत हरवलेल्या अल्पवयीन मुलींनी पोलिसांचा चांगलाच घाम काढला आहे. मुलगी हरवल्याची तक्रार येताच गांभीर्याने तिचा शोध घेण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागत आहे. परंतु काही प्रकरणांच्या तपासाअंती कौटुंबिक कारणावरून मुलींनी घर सोडल्याचे समोर आले आहे. त्यावरून विभक्त कुटुंब पध्दतीत पालक व पाल्य यांच्यातील कौटुंंबिक बंध शिथिल झाल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
१८ वर्षांखालील मुलगा किंवा मुलगी हरवल्यास तिच्या अपहरणाची तक्रार नोंदवून तशाच पध्दतीने तपास करायचा, असे न्यायालयाचे निर्देशच पोलिसांना आहेत. त्यानुसार हरवलेल्या प्रत्येक अल्पवयीन मुलांची नोंद करून पोलीस त्याचा तपासही गांभीर्याने करत आहेत. फ्रेन्शिला वाझ हिच्या हत्येचा उलगडा त्यामुळेच झालेला आहे, तर कामोठे येथून आईनेच घराबाहेर हाकललेल्या प्रियांका गुप्ता हिचा सुखरूप शोधही लागलेला आहे. मात्र अशाच काही इतर प्रकरणांच्या तपासाअंती वेगळेचे सत्य पोलिसांपुढे आले आहे. मागील पंधरा दिवसांत मुली हरवण्याच्या घडलेल्या पाच प्रकरणांत मुली स्वत: पळून गेल्याचे स्पष्ट झाले, तर पळून जाण्याची त्यांची कारणेही तितकीच किरकोळ व हास्यास्पद आहेत.
पावणे येथून १३ वर्षांची मुलगी शाळेत जाताना हरवल्याने तिच्या अपहरणाची नोंद तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांकडून तिचा शोध सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी ती उत्तर प्रदेश येथे बहिणीच्या घरी असल्याचे समजले. किरकोळ कौटुंबिक वादात तिने भावाला चकमा देवून रेल्वेने थेट उत्तर प्रदेश गाठले होते. त्यानंतर ऐरोली येथून १६ वर्षांची मुलगी बेपता असल्याची तक्रार दाखल झाली. या मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी जंग पछाडलेले असतानाच दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगी घरात हजर झाली. घरचे परवानगी नाकारतील म्हणून त्यांना न सांगताच ती मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीसाठी पनवेल येथे गेली होती.या प्रकरणातून पोलीस सुटकेचा श्वास घेत असतानाच रबाळे एमआयडीसी परिसरातून दोन अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची तक्रार पोलिसांकडे आली. हे प्रकरण जास्तच गांभीर्याने घेवून पोलीस त्यांचा शोध घेत असतानाच दोघीही वाडा परिसरात असल्याचे पोलिसांना समजले. रात्रीच्या वेळी मुक्कामासाठी त्यांनी पोलीस ठाण्याचाच आधार घेतला. त्यानुसार रबाळे एमआयडीसी पोलिसांनी वाडा पोलिसांशी संपर्क साधून दोघींनाही ताब्यात घेतले. मात्र घर सोडण्याचे कसलेही ठोस कारण त्यांनी सांगितले नाही.
या सर्व प्रकरणात ऐरोलीची घटना वगळता इतर मुलींचा वेळीच शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. परंतु या घटनांवरून पालक आणि पाल्य यांच्यातील कौटुंबिक बंध शिथिल होत असल्याचे दिसत आहे.
मागील पंधरा दिवसांत हरवलेल्या प्रत्येक अल्पवयीन मुलींचा वेळीच व सुखरूप शोध लागावा यासाठी प्रयत्न होते. त्यातच ऐरोलीच्या फ्रेन्शिला वाझ प्रकरणाचे गांभीर्यही डोळ्यासमोर होते. त्यामुळे अधिकाधिक पोलीस बळ हरवलेल्या मुलींच्या शोधकामात गुंतले होते. मात्र तपासाअंती त्या अल्पवयीन मुलींनी कौटुंबिक बंधन दूर सारत घर सोडून जाण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले. त्या सर्वांना सुखरूप कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
- शहाजी उमाप, पोलीस उपायुक्त.