Join us

पतीविराेधात खोटी तक्रार म्हणजे क्रूरताच : उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 07:49 IST

कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम

मुंबई :  पतीची वागणूक सुधारण्यासाठी  त्याच्याविरोधात पोलिसांत खोटी तक्रार दाखल करणे, या पत्नीच्या वागणुकीला विवाहित जोडप्याच्या सौहार्दपूर्ण नातेसंबंधात स्थान मिळू शकत नाही. अशी तक्रार करणे म्हणजे क्रूरताच आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले.न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. कुटुंब न्यायालयाने पतीचा घटस्फोट अर्ज मंजूर करताना म्हटले की, पत्नीने पतीचे वर्तन सुधारण्यासाठी त्याच्याविरोधात खोटी पोलिस तक्रार केली. त्याचा त्रास पतीला आणि त्याच्या घरच्यांना झाला.

‘पतीचे वर्तन सुधारण्यासाठी पोलिसांकडे खोटी तक्रार केल्याने पतीला व त्याच्या कुुटुंबीयांना नाहक त्रास सहन करावा लागला. एकमेकांवर विश्वास, आदर असलेल्या सौहार्दपूर्ण वैवाहिक नात्यात पत्नीच्या या वागण्याला स्थान नाही. तसेच जोडीदाराविरुद्ध खोट्या खटल्याने दुसऱ्या जोडीदाराचे मन दुखावले आहे. विवाहाचे गांभीर्य राखण्यासाठी जोडीदाराने सर्व विश्वासार्हता गमावली आहे, असे न्यायालयाने म्हटले.

पत्नीचे कृत्य घटस्फोट मंजूर करण्यास पुरेसेखोटी पोलिस तक्रार करून विवाह टिकविण्यासाठी आवश्यक असलेल्या मूल्यांना तडा गेला आहे. त्यामुळे पत्नीची वागणूक ही एक प्रकारची क्रूरता आहे आणि हिंदू विवाह कायदा १९५५ च्या  कल १३(१) (आय-ए) अंतर्गत घटस्फोट मंजूर करण्याचा आधारही आहे. पत्नीचे हे कृत्य पतीचा घटस्फोट अर्ज मंजूर करण्यास पुरेसे कारण आहे, असे म्हणत न्यायालयाने कुुटुंब न्यायालयाने पतीचा घटस्फोट अर्ज मंजूर करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

टॅग्स :उच्च न्यायालय