एसटीच्या भारमानात घसरण
By Admin | Updated: October 5, 2015 02:47 IST2015-10-05T02:47:10+5:302015-10-05T02:47:10+5:30
मोडकळीस आलेल्या बस, वाढलेला संचित तोटा, कमी झालेले प्रवासी भारमान अशी एसटी महामंडळाची स्थिती असतानाही राज्य शासनाकडून मात्र महामंडळाला यातून बाहेर पडण्यासाठी संधीच दिली जात नसल्याचे दिसत आहे

एसटीच्या भारमानात घसरण
सुशांत मोरे, मुंबई
मोडकळीस आलेल्या बस, वाढलेला संचित तोटा, कमी झालेले प्रवासी भारमान अशी एसटी महामंडळाची स्थिती असतानाही राज्य शासनाकडून मात्र महामंडळाला यातून बाहेर पडण्यासाठी संधीच दिली जात नसल्याचे दिसत आहे. गेल्या दोन वर्षात एसटी महामंडळाला तीन व्यवस्थापकीय संचालक लाभले असून यातील दोघांची तर संधी मिळताच बदली करण्यात आली आहे. यात आताच बदली झालेल्या संजय खंदारे यांचाही समावेश आहे. मध्यंतरी महामंडळाला व्यवस्थापकीय संचालक मिळत नसतानाही तर परिवहन आयुक्तांकडे तात्पुरता कार्यभार देण्यात आला होता. त्यामुळे दोन वर्षांत प्रवाशांसाठी मोठे निर्णय तर झाले नाहीतच; शिवाय भारमानातही वाढ झालेली नाही.
राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांची बदली एमएमआरडीएमध्ये अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली. त्यांच्या जागी सामाजिक न्याय विभागाच्या पुणे मुख्यालयात असलेले रणजितसिंग देओल रुजू होणार आहेत. खंदारे यांची बदली झाल्यामुळे एसटी महामंडळाला किमान तीन वर्षांसाठी व्यवस्थापकीय संचालकच मिळत नसल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन वर्षांत महामंडळाला तीन व्यवस्थापकीय संचालक लाभले. संजय खंदारे हे जून २0१४ मध्ये एसटीच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर आले आणि सप्टेंबर २0१५ पर्यंत कार्यरत राहिले. २0१४ मध्ये अवघ्या आठ महिन्यांत दोन सनदी अधिकारी हजरी लावून गेले. खंदारे यांच्यापूर्वी एसटीला साधारण दोन महिने व्यवस्थापकीय संचालक मिळत नव्हता. त्यावेळी राज्य परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. मोरे यांच्या आधी सहा महिने व्यवस्थापकीय संचालकपदी सध्या वन खात्याचे सचिव असलेले विकास खारगे होते. खारगे येण्याआधी एसटी महामंडळावर सर्वाधिक कार्यकाळ हा दीपक कपूर यांचा होता. कपूर जानेवारी २0१0 ते सप्टेंबर २0१३ पर्यंत एसटीच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावर होते. सध्या महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक असलेले ओ. पी. गुप्ता यांनीही कपूर पावणेतीन वर्षे कार्यभार सांभाळला होता.