Join us
Daily Top 2Weekly Top 5

...अन् बँकेच्या लॉकरमधून निघाले बनावट दागिने; पावणेचार कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 05:55 IST

सुवर्ण मूल्यांकन अधिकाऱ्यानेच बँकेला पावणेचार कोटींचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार धारावीत उघडकीस आला आहे.

मुंबई : सुवर्ण मूल्यांकन अधिकाऱ्यानेच बँकेला पावणेचार कोटींचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार धारावीत उघडकीस आला आहे. बनावट दागिने आणि ग्राहकांच्या मदतीने त्याने ही फसवणूक केली आहे. रामस्वामी नाडर (४३) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याने परीक्षण केलेले सोने पिवळ्या रंगाचा धातू असल्याचे उघड होताच त्याला अटक करण्यात आली.नाडर हा अ‍ॅण्टॉपहील येथील रहिवासी आहे. तो धारावीच्या इंडियन बँकेतील सोने कर्ज विभागात गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत आहे. त्याचे स्वत:चे सोने विक्रीचेही दुकान आहे. बँकेने नुकतेच त्यांच्याकडे गहाण ठेवलेले सोने लिलावात काढण्याचे ठरविले. त्यानुसार, त्यांनी बँकेच्या लॉकरमधील ७७ खण उघडले. त्यात सोन्याऐवजी पिवळ्या रंगाचे धातू मिळून आले. या प्रकाराने बँकेतील अधिकाऱ्यांना धक्काच बसला. त्यांनी तत्काळ धारावी पोलीस ठाणे गाठून तकार दिली. त्यांच्या तक्रारीवरून धारावी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत अधिक तपास सुरू केला.पोलिसांनी नाडरकडे कसून चौकशी केली. मात्र, चौकशीत तो या घोटाळ्यात आपला काहीही सहभाग नसल्याचे सांगत होता. अखेर, पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने दादरमधून बनावट दागिने खरेदी केले. १२ बनावट ग्राहकांच्या मदतीने त्यांना कर्ज दिले. कर्जासाठी बँकेकडे गहाण ठेवण्यात येणाºया सुवर्णालंकारांचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी नाडरवर होती. त्याच्या प्रमाणपत्राआधारे बँकेकडून ग्राहकांना कर्ज दिले जात होते. नाडरने आपल्या साथीदारांनाच ग्राहक असल्याचे सोंग घेण्यास सांगितले. गहाण ठेवण्यासाठी त्यांच्या हाती बनावट दागिने दिले. ते खरे असल्याचे प्रमाणपत्र बँकेला देऊन त्यांचे कर्ज मंजूर करून घेतले. यात बँकेची तब्बल ३ कोटी ७७ लाखांची फसवणूक झाली आहे. त्याने एका झोपडपट्टीतून या ग्राहकांना आणले होते. त्यांना काही पैसे देत या घोटाळ्यात सहभागी करून घेतले होते. नाडरने या पैशांतून आलिशान घर, गाडी, दुचाकी खरेदी केल्याचेही तपासात समोर आले. न्यायालयाने त्याला १७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.>सायनच्या बँकेतही घोटाळा केल्याचा संशयनाडर हा सायनच्या एका बँकेतही सोने पडताळणीचे काम करायचा. त्याने तेथेही असाच घोटाळा केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार, अधिक तपास सुरू आहे.