Join us  

खोट्या कंपन्यांच्या आधारे 2100 कोटींचे बनावट बिल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 1:56 AM

घोटाळा उघडकीस : राज्याच्या जीएसटी विभागाने केला भांडाफोड

मुंबई : राज्याच्या वस्तू व सेवा कर विभागाने मोठी कारवाई करत बोगस विक्री बिलांचा जीएसटी घोटाळा उघडकीस आणला आहे. तीस कंपन्यांच्या माध्यमातून २१०० कोटींची खोटी विक्री बिले वितरित करणाऱ्या दिलीपकुमार तिब्रेवाला या व्यक्तीस अटक करण्यात आली.

दिलीपकुमार तिब्रेवाला याने आपल्या कुटुंबीयांच्या नावे चार तर परिचितांच्या नावे २६ कंपन्यांची जीएसटीअंतर्गत नोंदणी केली. या तीस कंपन्यांच्या आडून कोणत्याही वस्तूंची प्रत्यक्ष विक्री अथवा सेवा न पुरविता तब्बल २१०० रुपयांपेक्षा अधिक किमतीची विक्री बिले विविध कंपन्यांना वितरित केली. तिब्रेवाला यांनी कोणतीही सेवा न देताच वितरित केलेल्या या विक्री बिलामुळे संबंधित कंपन्यांना जवळपास १८५ कोटी इतक्या रकमेचे इनपुट टॅक्स रिबेट उपलब्ध करून दिले. त्यामुळे सरकारचा तितक्याच रकमेचा महसूल बुडाला. राज्य कर आयुक्त संजीव कुमार, सहआयुक्त (अन्वेषण) संपदा मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त सत्यजीत भांड, ए. पी. सरावणे, सहायक राज्यकर आयुक्त आशिष कापडणे यांच्या पथकाने ही कारवाई केल्याचे कार्यालयाने प्रसिद्धि पत्रकाद्वारे कळविले आहे. राज्याच्या जीएसटी विभागाने केलेली अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई असून आरोपीला पाच वर्षांपर्यंत तुरुंंगवासाची शिक्षा होऊ शकते.

पाच डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीराज्य कर सहआयुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी पोलिसांच्या उपस्थितीत तिब्रेवाला याला ताब्यात घेतले. तिब्रेवाला याला अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी ५ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई